बीड
नायगावात उद्या चव्हाण पिता–पुत्रांच्या पुतळ्याचे अनावरण _मलीकार्जुन खर्गे, शरद पवार, अजीत पवार,अशोक चव्हाणसह दिगज नेते राहणार उपस्थित_

नायगावात उद्या चव्हाण पिता–पुत्रांच्या पुतळ्याचे अनावरण
_मलीकार्जुन खर्गे, शरद पवार, अजीत पवार,अशोक चव्हाणसह दिगज नेते राहणार उपस्थित_
नायगाव:-नायगाव तालुक्यातील सामाजिक समतेचे प्रणेते कै.मा.आ बळवंतराव पाटील चव्हाण व नांदेड जिल्ह्याचे लोकनेते, स्व. खासदार वसंतराव बळवंतराव पाटील चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते दि. २६ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे राहणार आहेत. विशेष पाहुणे म्हणून कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांची उपस्थिती लाभणार आहे.तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खा.अशोकराव चव्हाण,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची विशेष उपस्थिती असणार आहे.यासह महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर व दिग्गज नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.
अनावरण सोहळ्याच्या दिवशी हनुमान मंदिर परिसरात दुपारी १ पासुन ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत भोजन व्यवस्था करण्यात आली असून, रात्री ८ ते ११ या वेळेत ह.भ.प श्री. पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणा यांचे कीर्तन होणार आहे. या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक, कार्यकर्ते, शेतकरी, युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन खा. रवींद्र चव्हाण व चव्हाण कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे.
कै.मा.आ बळवंतराव पाटील चव्हाण हे नायगाव तालुक्यातील प्रगल्भ समाजसेवक व सामाजिक समतेचे प्रणेते म्हणून ओळखले जात. ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार, दलित-शोषित यांचे प्रश्न समजून घेत त्यांनी सामाजिक सलोखा व लोकजागृतीचे कार्य केले. त्यांच्या कार्यामुळे समाजामध्ये समानतेचा भाव दृढ झाला.
त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेत त्यांचे सुपुत्र स्व.खा वसंतराव बळवंतराव पाटील चव्हाण यांनी लोकनेते म्हणून आपली छाप सोडली. लोकसभेत खासदार म्हणून निवडून आलेल्या वसंतराव चव्हाण यांचा फार काय कार्यकाल राहिलेला नाही.परंतु शेतकरी, कामगार, विद्यार्थी व सामान्य नागरिकांच्या हक्कासाठी लढा देणे हेच त्यांच्या राजकारणाचे वैशिष्ट्य राहिले. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासकामांना गती मिळाली व जनतेमध्ये त्यांच्याविषयी आत्मीयतेचा भाव निर्माण झाला.
त्यामुळे २६ ऑगस्टचा हा अनावरण सोहळा केवळ पुतळा उभारणीचा कार्यक्रम नसून, सामाजिक कार्याची प्रेरणा देणाऱ्या दोन थोर व्यक्तिमत्वांच्या स्मृतींना अभिवादन करण्याचा सोहळा ठरणार आहे.


