📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

जागतिक महिला दिनानिमित्त श्रीवर्धन येथे मोफत स्त्रीरोग तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन

जागतिक महिला दिनानिमित्त श्रीवर्धन येथे मोफत स्त्रीरोग तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन

श्रीवर्धन (संदेश घोलप): महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढविणे आणि त्यांना वेळेवर योग्य वैद्यकीय तपासणी व उपचार उपलब्ध करून देणे या उद्देशाने श्रीवर्धन येथील मातोश्री हॉस्पिटलच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विशेष मोफत स्त्रीरोग तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, दि. ८ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० या वेळेत आयोजित करण्यात येणार असून श्रीवर्धन परिसरातील महिलांनी व किशोरवयीन मुलींनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या शिबिरामध्ये पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ञ डॉ. अबोली कदम-तळेकर तसेच डॉ. अमृता मुकेश श्रीवर्धनकर या महिलांची मोफत तपासणी करून आवश्यक ते वैद्यकीय सल्ला व उपचार देणार आहेत. ग्रामीण भागातील अनेक महिलांना स्त्रीरोगांसंदर्भात योग्य वेळी तपासणी मिळत नाही किंवा संकोचामुळे त्या उपचार घेत नाहीत. त्यामुळे अशा शिबिरांमुळे महिलांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन व उपचार घेण्याची चांगली संधी उपलब्ध होणार आहे.
या शिबिरात महिलांसाठी विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या व मार्गदर्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामध्ये प्रसूतीपूर्व तपासणी, प्रसूतीनंतरची तपासणी, वंध्यत्व निवारण व उपचार, गर्भपिशवीसंबंधित समस्या व त्यावरील उपचार, तांबी बसविणे (कॉपर-टी), पी.सी.ओ.डी. (Polycystic Ovarian Disease) संबंधित तपासणी व उपचार यांचा समावेश आहे. याशिवाय किशोरवयीन मुलींना येणाऱ्या शारीरिक व हार्मोनल समस्यांबाबत मार्गदर्शन केले जाणार असून कुटुंब कल्याण नियोजन, आरोग्यदायी मातृत्व व महिलांच्या सर्वांगीण आरोग्याबाबत सल्ला दिला जाणार आहे.
मासिक पाळी संदर्भातील विविध तक्रारी जसे की अतिरक्तस्राव, ओटीपोटात होणारे दुखणे, पांढरे किंवा लाल स्त्राव यासारख्या समस्यांवरही तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व मार्गदर्शन केले जाणार आहे. महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना योग्य उपचार मिळवून देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
हे शिबिर मातोश्री हॉस्पिटल, वाणी आळी, ता. श्रीवर्धन, जि. रायगड येथे आयोजित करण्यात आले असून श्रीवर्धन व परिसरातील सर्व महिला, तसेच किशोरवयीन मुलींनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शिबिरासंदर्भात अधिक माहितीसाठी ८६६ ८७७ ०३९५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आयोजकांनी कळविले आहे.
Back to top button