बीड
ठेकेदारी अन् भ्रष्टाचाराच्या चिखलात २४ कोटींच्या नळपाणी योजनेचा पुरता बोजवरा!!

ठेकेदारी अन् भ्रष्टाचाराच्या चिखलात २४ कोटींच्या नळपाणी योजनेचा पुरता बोजवरा!!
आगामी निवडणुकीत श्रीवर्धनकर ‘घराणेशाही’ला पाणी पाजणार -पिंट्याशेठ वेश्विकर (विरोधी पक्ष नेता)
श्रीवर्धन (संदेश घोलप) एकीकडे कोट्यवधी रुपयांच्या पाणी योजनांचे कागदी घोडे नाचवले जात असताना, दुसरीकडे मात्र ऐतिहासिक श्रीवर्धनची जनता पाण्यासाठी थेंब-थेंब तडफडत आहे. जनतेने मोठ्या विश्वासाने ज्या लोकप्रतिनिधींना मतदान करून निवडून दिले, त्यांनीच आता जनतेला वाऱ्यावर सोडल्याची तीव्र भावना निर्माण झाली आहे. २४ कोटी रुपयांच्या नळपाणी योजनेत झालेल्या कथित भ्रष्टाचारामुळे श्रीवर्धनकरांवर ही भीषण वेळ आली असून, “संबंधित कंत्राटदाराला अद्याप ब्लॅकलिस्ट का टाकले नाही? त्याच्यावर अद्याप गुन्हा का नोंदवला नाही? तो सरकारचा जावई आहे का?” असा थेट आणि आक्रमक सवाल श्रीवर्धन नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते पिंट्याशेठ वेश्विकर यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला असून या मुद्द्यावरून आता संपूर्ण तालुक्यात राजकीय खळबळ उडाली आहे.
म्हसळ्याच्या डम्पिंग ग्राउंडची काळजी, मग श्रीवर्धनकरांनी काय पाप केलं?
काही दिवसांपूर्वी म्हसळ्याच्या डम्पिंग ग्राउंडला आग लागली, तेव्हा तिथल्या कंत्राटदाराला खडे बोल सुनावल्याच्या बातम्या काल वृत्तपत्रांमध्ये मोठ्या दिमाखात झळकल्या. यावरून टोला लगावताना श्रीवर्धन नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते पिंट्याशेठ वेश्विवकर यांनी म्हटले की, डम्पिंग ग्राउंडच्या त्या कचऱ्यातून या नेत्यांना नक्की काय साध्य करायचे होते? दुसरीकडे, श्रीवर्धनमधील माता-भगिनींना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असताना प्रशासन आणि सत्ताधारी नेत्यांचे डोळे का उघडत नाहीत? म्हसळ्यातील आगीवर तत्परता दाखवणाऱ्या नेत्यांना श्रीवर्धनकरांच्या कंठाला पडलेली कोरड का दिसत नाही? श्रीवर्धनच्या जनतेने लोकप्रतिनिधींना निवडून देऊन काय पाप केले आहे? असे अनेक बोचरे प्रश्न आता विरोधी पक्षाने जाहीरपणे उपस्थित केले आहेत.
२४ कोटींची योजना की भ्रष्टाचाराचे कुरण? ‘ठेकेदारी अन् टक्केवारी’चा खेळ!
श्रीवर्धन शहराचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटावा यासाठी तब्बल २४ कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. मात्र, निकृष्ट दर्जाचे काम, ठेकेदारी आणि टक्केवारीच्या गलिच्छ खेळामुळे ही योजना पूर्णपणे अपयशी ठरली आहे. या योजनेची पाईपलाईन सतत फुटत असून त्यातून दररोज लाखो लीटर शुद्ध पाणी रस्त्यावर वाहून वाया जात आहे. कोट्यवधी रुपये खर्च होऊनही जनतेचे घसे कोरडेच आहेत. या योजनेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाल्याचा थेट आरोप पिंट्याशेठ वेश्वीकर यांनी केला आहे. इतका गंभीर घोळ घालूनही संबंधित कंत्राटदारावर कोणतीही ठोस कारवाई किंवा गुन्हा दाखल न झाल्याने, प्रशासनाच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या अभद्र युतीवर संशयाची मोठी सुई निर्माण झाली आहे.
एकाच घरात खासदार, आमदार, मंत्री… तरीही श्रीवर्धनकर तहानलेलेच!
श्रीवर्धनमध्ये वर्षानुवर्षे एकाच घराण्याची राजकीय हुकूमशाही आणि घराणेशाही चालत आली आहे. एकाच घरात खासदार, आमदार, मंत्री, विधान परिषद आमदार आणि दोन-दोन माजी आमदार… अशी सत्ता आणि पदांची अभूर्व रेलचेल असतानाही जनतेच्या नशिबी मात्र पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. “एकाच घराने अजून किती जनतेच्या पैशांचा मलिदा लाटणार?” असा संतप्त सवाल आता श्रीवर्धनची जनता उघडपणे विचारू लागली आहे. विकासाच्या नावाखाली केवळ आश्वासनांची खैरात आणि प्रत्यक्ष पदरी निराशा आल्याने आता मतदारांचा संयम पुरता सुटला आहे.
आगामी निवडणुकीत घराणेशाही खिळखिळी करणार!
”ज्या जनतेने तुम्हाला डोक्यावर घेतले, तीच जनता आता तुम्हाला तुमची जागा दाखवेल,” असा थेट इशारा विरोधी पक्षनेते पिंट्याशेठ वेश्वीकरांनी दिला आहे. पाण्याच्या एका-एका थेंबासाठी तडफडणारे श्रीवर्धनकर आगामी निवडणुकीत या घराणेशाहीला मतदानातून ‘पाणी पाजल्याशिवाय’ आणि सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाहीत, असा आक्रमक पवित्रा वेश्विकरांनी घेतला आहे. श्रीवर्धन नगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्यांनीच आता या पाण्याच्या मुद्द्यावरून थेट शिंग फुंकल्यामुळे सत्ताधारी बॅकफूटवर गेले असून, या वाढत्या जनक्षोभाची दखल प्रशासन घेणार की नेहमीप्रमाणे टक्केवारीच्या नशेत डोळेझाक करणार, याकडे आता संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे
पिंट्याशेठ वेश्विकर (विरोधी पक्ष नेता)फोटो: –



