बीड
चिंचाळा परिसरात सौर पंपांच्या केबल चोरीचे सत्र; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

चिंचाळा परिसरात सौर पंपांच्या केबल चोरीचे सत्र; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
आष्टी तालुक्यातील चिंचाळा येथे अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ; अनेक शेतकऱ्यांचे नुकसान
आष्टी (प्रतिनिधी) – आष्टी तालुक्यातील चिंचाळा परिसरात शेतकऱ्यांच्या सौर पंपांच्या केबल व मोटारी चोरीच्या घटना वाढत असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी चिंचाळा येथील शेतकरी राधाकिसन साधू पोकळे (वय ६५) यांनी आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अदखलपात्र (NCR) नोंद केली आहे.
तक्रारीनुसार, राधाकिसन पोकळे यांचे चिंचाळा शिवारातील सर्वे क्रमांक २६ मधील शेतात शेततळ्यावर सौर पंप बसविण्यात आला आहे. दि. १५ जून २०२६ रोजी सायंकाळी शेतातील कामे पूर्ण करून ते घरी परतले. मात्र दुसऱ्या दिवशी, दि. १६ जून रोजी सकाळी शेतात गेल्यानंतर त्यांना सौर पंपाच्या विहिरीत जाणारी केबल गायब असल्याचे आढळून आले.
घटनास्थळी पाहणी केली असता सौर पंपाजवळील वायर कापून सुमारे १०० फूट लांबीची केबल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे निदर्शनास आले. चोरी गेलेल्या केबलची अंदाजे किंमत ४,५०० रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, याच परिसरातील योगेश बाबासाहेब पोकळे, सागर बाळू पोकळे, अतुल गहिनीनाथ पोकळे, अशोक बापूराव पोकळे, किरण संजय पोकळे व दिगंबर शामराव पोकळे या शेतकऱ्यांच्या शेतातील केबल वायर व मोटारी देखील चोरीस गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे परिसरात संघटित चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सततच्या चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून शेतीच्या कामांवर परिणाम होत आहे. या चोरींचा तातडीने तपास करून आरोपींना अटक करावी तसेच शेतकऱ्यांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी पोलीस प्रशासनाने गस्त वाढवावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, आष्टी पोलिसांनी तक्रारीची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. ग्रामीण भागात वाढत असलेल्या शेतमाल व कृषी उपकरणांच्या चोरीच्या घटनांमुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.


