बीड
डॉ. गणेश ढवळे यांना ‘समाजरत्न २०२६’ राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव

डॉ. गणेश ढवळे यांना ‘समाजरत्न २०२६’ राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव
पद्मश्री नेत्ररोगतज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते सन्मान; जनहिताच्या प्रश्नांवरील आंदोलनांची दखल
बीड : (दि.१६) दैनिक लोकनेताच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांना ‘समाजरत्न २०२६’ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. परळी येथील भागवत पॅलेस येथे झालेल्या या भव्य कार्यक्रमात जगप्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ पद्मश्री तात्याराव लहाने यांच्या हस्ते सन्मानपत्र व मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी बाप आयटी संस्थापक रावसाहेब घुगे ,अभिनेत्री मेघना झुझुम, दैनिक लोकनेता मुख्य संपादक ज्ञानेश्वर मुंडे तसेच उपसंपादक विजय रोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ग्रामीण भागातील सरकारी शाळांच्या मुलभूत सुविधा, आत्महत्याग्रस्त शेतकरी, आरोग्य, रस्ते, वीज, पाणी, वृक्षलागवड तसेच विविध जनहिताच्या प्रश्नांवर अनोख्या व लक्षवेधी आंदोलनांच्या माध्यमातून शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल डॉ. ढवळे यांच्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला.
डॉ. गणेश ढवळे हे बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रचार प्रमुख म्हणूनही कार्यरत आहेत. पुरस्कार स्वीकारताना त्यांच्यासोबत शेख युनुस च-हाटकर, शेख मुबीन व दत्तात्रय घरत यांची उपस्थिती होती.
या पुरस्काराबद्दल सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते तसेच विविध स्तरांतील शुभचिंतकांकडून डॉ. गणेश ढवळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



