बीड
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे रायगडमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांची जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे रायगडमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल;
खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांची जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती
रायगड/अलिबाग : (संदेश घोलप)
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने रायगड जिल्ह्यात महत्त्वपूर्ण फेरबदलांची घोषणा केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी भिवंडीचे विद्यमान खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांची ‘रायगड जिल्हा प्रभारी’ म्हणून नियुक्ती केली आहे.
१ मे २०२६ रोजी पार पडलेल्या आढावा बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. रायगडमध्ये पक्ष अधिक प्रभावीपणे वाढावा, कार्यकर्त्यांना बळ मिळावे आणि सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या अडचणींना ठामपणे सामोरे जाता यावे, यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत होती. याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी खासदार म्हात्रे यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
विद्यमान खासदाराला प्रभारीपदाची जबाबदारी दिल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, संघटनात्मक पातळीवर सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याचे चित्र आहे.
रायगडचे दोन संघटनात्मक भाग; १५ दिवसांत जिल्हाध्यक्षांची घोषणा
या बैठकीत आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेत रायगड जिल्ह्याची संघटनात्मक पुनर्रचना करण्याचे ठरविण्यात आले. जिल्ह्याचा मोठा भौगोलिक विस्तार लक्षात घेता, ‘दक्षिण रायगड’ आणि ‘उत्तर रायगड’ असे दोन विभाग करण्यात येणार असून, दोन्ही भागांसाठी स्वतंत्र जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली जाणार आहे.
प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार, नव्याने नियुक्त झालेले प्रभारी खासदार सुरेश म्हात्रे हे येत्या १५ दिवसांत योग्य उमेदवारांची निवड करून जिल्हाध्यक्षांची घोषणा करणार आहेत.
या सर्व निर्णयांचे रायगड जिल्हा संघटक तथा श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष अझहर धनसे यांनी स्वागत केले आहे. त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की,
“यापूर्वी संघटन बळकटीसाठी अशी थेट साथ नव्हती. आता खासदार महोदय प्रभारी म्हणून २४ तास आमच्या पाठीशी उभे राहणार असल्याने कार्यकर्त्यांना मोठा आधार मिळाला आहे. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी घेतलेले निर्णय पक्षवाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. यामुळे रायगडमध्ये पक्ष निश्चितच मोठी भरारी घेईल.”
रायगड जिल्ह्यातील या संघटनात्मक बदलांमुळे आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष अधिक सक्षमपणे उभा राहील, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जात आहे.



