माहिला शिवजन्मोत्सव समितीच्या पुढाकाराने शिवकालीन शस्त्रांचे अनोखे दर्शन

माहिला शिवजन्मोत्सव समितीच्या पुढाकाराने शिवकालीन शस्त्रांचे अनोखे दर्शन
जामखेड नगरीत शस्त्रसंग्रह प्रदर्शन ; माझे स्वप्न साकार- पोपटलाल हळपावत
जामखेड, दि. १९ (प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जामखेड येथे ऐतिहासिक शस्त्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी नाणी संग्राहक पोपटलाल हळपावत यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. अनपेक्षितपणे उद्घाटनाचा योग मिळाल्याने आपण भाग्यवान असल्याचे त्यांनी सांगितले.
हे शस्त्रप्रदर्शन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम वाचनालय, नवीन नगर परिषद, जामखेड येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन महिला शिवजन्मोत्सव समिती, जगदंब प्रतिष्ठान, राजमुद्रा युवा मंच, शंभूसूर्य मर्दानी आखाडा आणि युगंधर शस्त्रसंग्रह करकंब यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन आणि अभिवादनाने झाली. त्यानंतर नाणी संग्राहक पोपटलाल हळपावत यांच्या हस्ते शस्त्रप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी उमेश देशमुख, मुकुंदराज सातपुते, माजी प्राचार्य अनंता खेत्रे, डॉ. सागर शिंदे, जगदंब प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय काशिद, महिला शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षा रोहिणीताई काशिद, शंभूसूर्य मर्दानी आखाड्याचे बबलू टेकाळे, जुबेर पठाण, राजू भांबे, युवा उद्योजक किरण मुळे, अमोल निमोणकर, किशोर काळे, दीपक सुरसे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना हळपावत म्हणाले, “राजेंद्र अनवते यांनी हा अनमोल शस्त्रसंग्रह जतन केला आहे आणि संजय काशिद व रोहिणी काशिद यांनी त्याचे प्रदर्शन आयोजित करून माझे स्वप्न साकार केले आहे. या प्रदर्शनामुळे जामखेडकरांना शिवछत्रपतींच्या पराक्रमांची ओळख होईल, याचा मला आनंद आहे.”
शिवकालीन शस्त्रांचे अनोखे दर्शन
या प्रदर्शनामध्ये विविध ऐतिहासिक शस्त्रांचे दर्शन घडवण्यात आले. विशेषतः युवा पिढी आणि शालेय विद्यार्थ्यांना इतिहासाची माहिती होण्यासाठी याचा उपयोग होईल, असे आयोजक संजय काशिद यांनी सांगितले. या वेळी राजेंद्र अनवते यांनी उपस्थितांना शस्त्रांची सविस्तर माहिती दिली.
सायंकाळी पोलीस निरीक्षक महेश पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रदर्शनाला भेट दिली आणि आयोजनाबद्दल संजय काशिद व रोहिणी काशिद यांचे आभार मानले.
*चौकट*
युवा वर्ग आणि विद्यार्थ्यांसाठी हा एक प्रेरणादायी उपक्रम ठरू शकतो, कारण तो इतिहासाच्या पाऊलखुणा समजून घेण्याची संधी देतो. जामखेड नगरीत असा उपक्रम होणे, हे निश्चितच अभिमानास्पद आहे.
महेश पाटील
पोलीस निरीक्षक, जामखेड पोलीस स्टेशन



