बीड

ग्रामीण खेळाडूंना राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय संधी देणारा उपक्रम : विष्णू जोशीलकर

ग्रामीण खेळाडूंना राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय संधी देणारा उपक्रम : विष्णू जोशीलकर

जामखेड येथे खुल्या राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न

मॅरेथॉनमध्ये संभाजीनगरच्या रामेश्वर गुंजाळ यांचे प्रथम पारितोषिक

जामखेड प्रतिनिधी :
जामखेडसारख्या ग्रामीण भागात हाफ मॅरेथॉनसारखी राज्यस्तरीय स्पर्धा सातत्याने आयोजित करणे हे मोठे धाडसाचे व प्रेरणादायी काम आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांची दारे उघडून देण्याचे कार्य या उपक्रमातून होत असून, जामखेड येथील मल्लविद्या संस्कार कुस्ती क्रीडा संकुलातून भविष्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू व मल्ल घडतील, असा विश्वास छत्रपती पुरस्कारप्राप्त, सिनेअभिनेते तथा महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर यांनी व्यक्त केला.

मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशनच्या वतीने अहिल्यानगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त गेल्या सहा वर्षांपासून खुल्या राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी जामखेड येथे ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली.स्पर्धेनंतर विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ झाला.यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर होते. यावेळी जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात,आयोजक बबन काशिद, नगरसेवक मोहन पवार, संजय काशिद, उद्योगपती देविचंद डोंगरे, त्रिदल आजी-माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष कॅप्टन लक्ष्मण भोरे, आरिफ शेख, आकाश बाफना, नगरसेविका जया गव्हाळे, आशाबाई टकले, डॉ.भरत दारकुंडे, प्रकाश तांबे, बबलू (वस्ताद) टेकाळे, स्नेहल भोसले, युवा नेते संतोष गव्हाळे, विजय काशिद आदी मान्यवर व बबन काशिद यांच्या परिवारासह स्पर्धेसाठी पंच, त्रिदल आजी माजी संघटनेचे पदाधिकारी व स्पर्धेक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यातील विविध जिल्ह्यांतून तसेच कर्नाटकातूनही स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. खुल्या गटात संभाजीनगर येथील रामेश्वर गुंजाळ यांनी प्रथम क्रमांक पटकावला.स्पर्धेची सुरुवात स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.

प्रा. मधुकर राळेभात म्हणाले की, खेळात यश मिळविण्यासाठी वय नव्हे तर जिद्द, चिकाटी व सातत्य महत्त्वाचे असते. गेल्या सहा वर्षांपासून जामखेड तालुक्यात खेळाची गोडी निर्माण करण्याचे काम या स्पर्धेच्या माध्यमातून बबन काशिद यांचे काम सुरू आहे. आज भलेही पहिल्या क्रमांकावर जामखेडचा खेळाडू नसेल, पण पुढील काळात हेच खेळाडू मोठ्या स्पर्धांमध्ये चमकतील,या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना खेळांचे संस्कार मिळतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आयोजक बबन काशिद म्हणाले की, जामखेड ही संस्कारांची भूमी असून येथील पुढील पिढी सुदृढ, तंदुरुस्त व संस्कारक्षम व्हावी, हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी कोणत्या ना कोणत्या स्पर्धेत सहभागी होणे आवश्यक असून, खेळाच्या माध्यमातून शिस्त, आत्मविश्वास व सकारात्मकता निर्माण होते.स्पर्धेत जे भाग घेतात तेच जिंकतात जिवनात यशस्वी होण्यासाठी कोणत्या ना कोणत्या स्पर्धेत भाग घेतला पाहिजे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन निलेश दिवटे यांनी केले तर आभार श्रीकांत काशिद यांनी मानले. स्पर्धेदरम्यान पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
—————————————–
मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशन आयोजित भव्य राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धा २०२६ चे गटनिहाय विजेते खालील प्रमाणे.

२१ किमी पुरुष खुलागट

१. प्रथम – रामेश्वर गुंजाळ (छ. संभाजीनगर) २१,००० रु वेळ १ तास १२ मी.,
२. द्वितीय – सार्थक काळेल (पुणे) १५,००० रु वेळ १ तास १७ मी.,
३. तृतीय – दिगंबर डमाले (अ.नगर) रु. ११,००० रु.
४. चौथा – विक्रम बोराडे (अ.नगर) ७,००० रु.
५. पाचवा – विलास खरात (छ. संभाजीनगर) ५,००० रु.
६. उत्तेजनार्थ – गोपाळ काळे (जामखेड)

११ किमी खुला गट महिला

१. प्रथम – सुरेखा मातने (पुणे) ११,००० रु,
२. द्वितीय – प्रिया गुळवे (पारनेर) ७,००० रु.
३. तृतीय – शीतल भंडारी ५,००० रु.
४. चौथा – अमृता मांडवे रु ३,००० रू.
५. पाचवा- रिद्धी सप्रे २,००० रु.

५ किमी सोळा वर्षाच्या खालील मुले

१. प्रथम – अलबक्ष शेख (पारनेर)५,००० रु,
२. द्वितीय – नवनाथ बेंद्रे (अ.नगर) ३,०००रु
३. तृतीय – आदित्य अडाले (जामखेड) २,००० रु

५किमी सोळा वर्षाच्या खालील मुली

१. प्रथम – ज्ञानेश्वरी लामखाडे (पारनेर) ५,०००रु.
२. द्वितीय – वैभवी खेडकर (अ.नगर) ३,००० रु
३. तृतीय – माही परदेशी (अ.नगर) २,०००

विशेष उल्लेखनीय – यशश्री औटे (५ किमी) (ओपन हार्ट सर्जरी)
वरिष्ठ गट ५० वर्षांपुढील पुरुष ४ किमी

१. प्रथम – डॉ पांडुरंग सानप (जामखेड ) ५,००० रु,
२. द्वितीय – बबन नाईक ( जामखेड ) ३,०००रु
३. तृतीय – आप्पा शिरसाठ ( जामखेड ) ३,००० रु
बाल गट १० वर्षा खालील २ किमी
१. प्रथम – आयुष जाधव (आळकुटी)३,००० रु,
२. द्वितीय – ओंकार रासकर (अहिल्यानगर) २,००० रु.
३. तृतीय – सार्थक जाधव (आळकुटी) १००० रु
विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र ,मेडल सन्मान चिन्ह, रोख रक्कम/ चेक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

Back to top button