कुख्यात सागर मोहळकरचा ससूनमध्ये मृत्यू ; सात गोळ्या… अखेरचा श्वास

कुख्यात सागर मोहळकरचा ससूनमध्ये मृत्यू ; सात गोळ्या… अखेरचा श्वास
जामखेड प्रतिनिधी :
जामखेड शहरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या थरारक गोळीबार प्रकरणाचा शेवट अखेर मृत्यूमध्ये झाला आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला कुख्यात गुंड सागर मोहळकर याचा सोमवारी सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
गेल्या बारा दिवसांपासून पुणे येथील ससून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते; मात्र जखमा गंभीर असल्याने त्याची प्रकृती सुधारू शकली नाही. ४ मार्चच्या रात्री जामखेड शहरातील नुराणी कॉलनी परिसरात सागर मोहळकर याच्यावर अचानक गोळीबार करण्यात आला होता.
या हल्ल्यात आरोपी अभिमन्यू पोते याने तब्बल सात राऊंड फायर केल्याची माहिती समोर आली होती. त्यापैकी चार गोळ्या मोहळकरच्या शरीरात घुसल्याने तो गंभीर जखमी झाला होता.
गोळीबारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. जखमी अवस्थेत मोहळकरला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रकृती चिंताजनक झाल्याने पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात हलवण्यात आले. गेल्या बारा दिवसांपासून डॉक्टर त्याच्यावर उपचार करत होते, मात्र अखेर सोमवारी सायंकाळी त्याची प्राणज्योत मालवली.
सागर मोहळकर हा जामखेड शहरात गुन्हेगारी कारवायांमुळे कुप्रसिद्ध झाला होता. त्याच्या हालचालींमुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्याच्या हालचालींमुळे नागरिकांसह पोलीस प्रशासनालाही वारंवार अडचणींना सामोरे जावे लागत होते.त्यामुळे त्याच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर शहरात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मुख्य आरोपी अभिमन्यू पोते याला अटक केली आहे.स्थानिक गुन्हे शाखा आणि जामखेड पोलीस याप्रकरणातील हल्लेखोरांचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.सागर मोहळकरच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले असून जामखेड शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे.



