बीड

शेतकरी अपघातग्रस्तांसाठी वैद्यकीय सहाय्य निधी नियमांत शिथिलतेची आ.सुरेश धस यांची मागणी

शेतकरी अपघातग्रस्तांसाठी वैद्यकीय सहाय्य निधी नियमांत शिथिलतेची आ.सुरेश धस यांची मागणी

आष्टी (प्रतिनिधी) बीड जिल्हाधिकारी कार्यालयात आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांची मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख डॉ. चैतन्य कागदे यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत मतदारसंघातील गंभीर आजारग्रस्त रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मदत मिळण्याबाबत तसेच निधीसाठी आवश्यक कागदपत्रे व प्रक्रियेमधील अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
ग्रामीण भागातील शेतकरी शेतीची कामे करत असताना ट्रॅक्टर, मळणी यंत्र, रोटावेटर, कडबा कुट्टी मशीन, ट्रॅक्टर ट्रॉली व इतर शेतीयुक्त अवजारे वापरताना होणाऱ्या अपघातांमध्ये गंभीर जखमी होत आहेत. मात्र अशा अपघातांनंतर उपचारासाठी सध्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मदत मिळत नसल्याची गंभीर बाब आमदार धस यांनी निदर्शनास आणून दिली. यामुळे अनेक शेतकरी कुटुंबांवर आर्थिक संकट ओढावत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी वैद्यकीय सहायता निधीच्या नियमांमध्ये आवश्यक ती शिथिलता देण्याची गरज असल्याचे मत यावेळी मांडण्यात आले. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाशी थेट संवाद साधून, शेतकऱ्यांना अपघातानंतर तातडीची व प्रभावी वैद्यकीय मदत मिळण्यासाठी धोरणात्मक बदल करण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
शेतकरी व ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी हा विषय प्राधान्याने मार्गी लावण्याचा ठाम निर्धार आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केला.

Back to top button