शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा व नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार

शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा व नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार
नवीन मराठी प्राथमिक शाळेत दिमाखदार समारंभ
आर्यन झेंडेसह ८ गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार
जामखेड – शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी तसेच दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यासाठी नवीन मराठी प्राथमिक शाळेत भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांचे यश आणि संस्थेच्या नव्या नेतृत्वाचा सन्मान या दुहेरी उद्देशाने कार्यक्रम उत्साहात पार पडला.
इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत सात विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत उल्लेखनीय यश मिळवले. आर्यन अशोक झेंडे (२६०), आरती शरद पोटे (२५६), दुर्वांशी गणेश रोडे (२४८), श्रेयस अनंत भिडे (२२०), सृष्टी वैभव अष्टेकर (२१४), विजयालक्ष्मी निलेश म्हेत्रे (२१२) आणि हर्ष रविंद्र गोपालघरे (२१२) यांनी शाळेच्या गुणवत्तेचा झेंडा उंचावला. तसेच इयत्ता आठवीतील आर्यन संजय काटे याने २२८ गुण मिळवून गुणवत्ता यादीत स्थान मिळवले.
या सर्व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष रमेश गिरमे, सचिव राजेंद्र देशपांडे, कोषाध्यक्ष उमेश देशमुख, संचालक डॉ. खैरनार व नंदकिशोर देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी दि.पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक डॉ. सुनील कटारिया व दीपक होशिंग यांचा देखील विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन सुटसुटीत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मिना राळेभात यांनी उपस्थितांचे आभार मानत विद्यार्थ्यांच्या यशामागील परिश्रम व शिक्षकांचे योगदानाबद्दल सांगितले.
हा समारंभ विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा ठरला असून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची साक्ष देणारा क्षण ठरला.



