“सुशोभित रस्ते, पण जीव धोक्यात!” माजलगाव नगर परिषदेच्या

मुख्याधिकाऱ्यांकडे दुर्लक्षाचा डोंगर!
बसस्थानकासमोरचा लाईट पोल कधीही कोसळण्याच्या स्थितीत; नागरिकांत तीव्र संताप!
माजलगाव बसस्थानकासमोरचा लाईट पोल जीवघेण्या अवस्थेत; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता
सुहास सावंत / माजलगाव
माजलगाव शहराच्या मध्यवर्ती बसस्थानकासमोर उभा असलेला धोकादायक लाईट पोल सध्या नागरिकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण करत आहे. नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे हा पोल एका बाजूला झुकलेला असून कधीही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरातील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी हा प्रकार घडत असून, प्रशासन मात्र डोळेझाक करत आहे.
रोज शेकडो प्रवासी, पथारी विक्रेते आणि वाहनधारक या भागातून जातात. अशा गर्दीच्या ठिकाणी पोलचे संतुलन बिघडलेले असताना नगर परिषदेचे अधिकारी निःसंवेदनशीलपणे शांत बसले आहेत. नागरिकांच्या मते, “हा पोल म्हणजे एक ‘टाइम बॉम्ब’ ठरू शकतो.”
शहर सुशोभिकरणाच्या नावाखाली हजारो रुपये खर्च करून आकर्षक लाईटिंग केली जात आहे, पण या धोकादायक पोलकडे मात्र कोणीही लक्ष देत नाही. हा विरोधाभास पाहून नागरिक संतप्त झाले आहेत. “मुख्याधिकारी नेमके कोणत्या कामात व्यस्त आहेत?” असा थेट सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
या गंभीर दुर्लक्षामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या निष्क्रीयतेबद्दल सर्वत्र नाराजी व्यक्त होत असून, जनतेमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
स्थानिक व्यापाऱ्यांनी आणि प्रवाशांनी सांगितले की, “पोल जोरदार वाऱ्याने कधीही कोसळू शकतो. दिवसा हजारो लोक या भागातून जातात. काही अनर्थ होण्यापूर्वीच प्रशासनाने तातडीने पाऊल उचलावे.”
नागरिकांनी नगर परिषदेने तातडीने या पोलची तपासणी करून तो दुरुस्त किंवा हटवावा अशी मागणी केली आहे. अन्यथा जनतेला आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशाराही दिला आहे.
सुशोभिकरणाच्या दिखाव्याऐवजी नागरिकांच्या जीवित सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अन्यथा जबाबदारी नगर प्रशासनावर राहील, असा इशारा जनतेतून दिला जात आहे. माजलगावकरांचे एकच म्हणणे —
मुख्याधिकारी साहेब“आधी सुरक्षितता, मग सजावट करा!” अशी जनता बोलत आहे.



