जळगाव

नारायण राणेंना पुरुन उरलोय, नादी लागू नका, गुलाबराव पाटलांचा भाजपा खासदाराला टोला

पावसाळ्यात अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानाची शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून भरपाई देण्यात येत आहे. राज्य सरकारनं जाहीर केलेल्या मदतीमध्ये जळगावचं नाव नसल्याचा आरोप करत खासदार उन्मेष पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर सडकून टीका केली. शेतकरी नुकसान भरपाई यादीत जळगाव जिल्ह्याचे नाव नाही, हे गुलाबभाऊ झोपा काढतात काय? असा सणसणीत टोला भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी लगावला.

या टीकेला पालकमंत्री पाटील यांनी सुद्धा सडेतोड उत्तर दिले आहे. भाजप खासदार आमच्यावर टीका करतात पण. त्यांनी एक स्वच्छतागृह बांधल्याचे दाखवावे, असं आव्हान गुलाबराव पाटील यांनी उन्मेष पाटील यांनी दिलं आहे. भारतीय जनता पार्टीचे खासदार उन्मेष पाटील यांच्यावर टीका करताना ते म्हणाले ,आम्ही दोन वर्षात काय केले असे भाजप खासदार उन्मेष पाटील विचारतात परंतु मी त्यांना विचारतो खासदार झाल्यावर खासदार निधीतून एक तरी स्वच्छतागृह बांधलं काय? हे दाखवून द्यावे, असं आव्हान गुलाबराव पाटील यांनी दिले.

उन्मेष पाटील यांना खासदार म्हणून आपण निवडून दिले आहे.आमदार किशोर पाटील तर तयारच नव्हते पण आपण त्यांना तयार केले आहे. त्यामुळे आपल्यावर टीका करताना त्यांनी विचार करावा आपण नारायण राणे यांच्या सारख्यांना पुरून उरलो आहोत त्या मुळे तुम्ही तर माझ्या पुढे कुठेच लागत नाही, असा इशाराच गुलाबराव पाटील यांनी दिला. आमदार किशोर पाटील यांच्या कार्याबाबत बोलताना ते म्हणाले, हे शेतकरी हितासाठी कायम आवाज उठवत असतात. नगरविकास विभागाकडून ही त्यांनी मोठ्या प्रमात निधी आणून शहराच्या विकास साधला असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

Back to top button