बीडमध्ये चार दिवसीय संगीतमय भक्तमाल कथेचे आयोजन; ह.भ.प. प्रकाश महाराज साठे करणार निरूपण

बीडमध्ये चार दिवसीय संगीतमय भक्तमाल कथेचे आयोजन; ह.भ.प. प्रकाश महाराज साठे करणार निरूपण
बीड, प्रतिनिधी :
स्वर्गीय झुंबरलालजी खटोड सामाजिक प्रतिष्ठान, बीड यांच्या वतीने गेल्या २५ वर्षांपासून संतविचार व भक्ती संस्कार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सातत्याने केले जात आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून दि. १० जून ते १३ जून २०२६ या कालावधीत अमृत मंगल कार्यालय, सुभाष रोड, बीड येथे चार दिवसीय संगीतमय भक्तमाल कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कथेचे निरूपण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, कथाकार तथा बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र ह.भ.प. प्रकाश महाराज साठे करणार आहेत. अधिक मासाच्या पवित्र पर्वकाळानिमित्त संपूर्ण महिनाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्याच मालिकेतील हा विशेष भक्तीमय सोहळा आहे.
वारकरी संप्रदायातील अनेक महान भक्तांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग, त्यांची भगवंतावरील निष्ठा, भक्तीची अलौकिक शक्ती आणि भक्तांसाठी भगवंताला प्रत्यक्ष प्रकट व्हावे लागल्याच्या कथा या चार दिवसांत संगीतमय स्वरूपात सादर करण्यात येणार आहेत. विविध संतभक्तांच्या जीवनचरित्रांवर आधारित या भक्तमाल कथेचे रसाळ आणि प्रभावी निरूपण ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांच्या मुखातून भाविकांना ऐकण्याची संधी मिळणार आहे.
या चार दिवसीय संगीतमय भक्तमाल कथेचे आयोजन दररोज सकाळी १०.३० ते दुपारी ३.०० आणि सायंकाळी ४.०० ते रात्री ९.०० या वेळेत करण्यात आले आहे. कथा एकूण चार सत्रांमध्ये संपन्न होणार असून प्रत्येक सत्र साधारणतः दीड तासांचे असेल. ( दि. १२ जून २०२६ (शुक्रवार) रोजी भक्तमाल कथेचे आयोजन केवळ सायंकाळी ५.०० ते रात्री ९.०० या वेळेत दोन सत्रांमध्ये करण्यात येणार आहे.)
भक्तिरसाने ओतप्रोत भरलेल्या या आध्यात्मिक सोहळ्यात वारकरी संप्रदायातील महान भक्तांच्या प्रेरणादायी कथा, त्यांची भगवंतावरील अखंड निष्ठा आणि भक्तीचे अलौकिक सामर्थ्य यांचे प्रभावी निरूपण ह.भ.प. प्रकाश महाराज साठे करणार आहेत.
अधिक मासाच्या पवित्र वातावरणात आयोजित करण्यात आलेली ही संगीतमय भक्तमाल कथा भाविकांसाठी आध्यात्मिक आनंदाची पर्वणी ठरणार आहे.
या भक्तिमय कार्यक्रमाचा लाभ बीड शहर व परिसरातील सर्व भाविक भक्तांनी घ्यावा, असे आवाहन स्वर्गीय झुंबरलालजी खटोड सामाजिक प्रतिष्ठान, बीड यांच्या वतीने करण्यात आले आहे.



