माईलस्टोनच्या विद्यार्थ्यांनी घेतला पंचायत राजचा प्रत्यक्ष अनुभव; सरपंच तांदळे यांनी तीन तास दिले मार्गदर्शन

माईलस्टोनच्या विद्यार्थ्यांनी घेतला पंचायत राजचा प्रत्यक्ष अनुभव; सरपंच तांदळे यांनी तीन तास दिले मार्गदर्शन
*बीड तालुक्यातील आदर्श गाव वंजारवाडीत एज्युकेशनल फिल्ड व्हिजिट; १४३ विद्यार्थ्यांचा सहभाग* —
*स्वयंशिस्त, स्वच्छता आणि शिक्षण यातूनच देशाचा विकास : सरपंच वैजनाथ तांदळे*
प्रतिनिधी | बीड
शालेय अभ्यासक्रमातील ‘पंचायत राज’ ही संकल्पना केवळ पुस्तकी न राहता विद्यार्थ्यांना त्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने बीड शहरातील माईलस्टोन इंटरनॅशनल स्कुलच्या वतीने शनिवार, ३ ऑक्टोबर रोजी बीड तालुक्यातील समृद्ध आणि आदर्श गाव वंजारवाडी येथे ‘एज्युकेशनल फिल्ड व्हिजिट’चे आयोजन संचालक ज्ञानेश्वर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. इयत्ता ५ वी ते ८ वी च्या तब्बल १४३ विद्यार्थ्यांनी या अभ्यास दौऱ्यात सहभाग नोंदवून ग्रामपंचायतीचे कामकाज आणि आदर्श गावाचे व्यवस्थापन प्रत्यक्ष समजून घेतले.
विद्यार्थ्यांच्या या भेटीदरम्यान वंजारवाडीचे सरपंच वैजनाथ तांदळे यांनी स्वतः तब्बल तीन तास वेळ देवून विद्यार्थ्यांशी संवाद साधला व मार्गदर्शन केले. देशाचा विकास करायचा असेल तर अगोदर गावाचा विकास करावा लागेल आणि गावाचा विकास स्वतःच्या विकासापासून सुरू होतो. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने स्वयंशिस्त, स्वच्छता आणि उत्तम शिक्षण अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रेरक विचार सरपंच तांदळे यांनी मांडले.
अभ्यास दौऱ्यादरम्यान विद्यार्थ्यांनी तब्बल एक तास सरपंच वैजनाथ तांदळे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. ग्रामपंचायतीचे नियोजन, निधीचे वाटप, स्वच्छता मोहिमा आणि वृक्षसंगोपन याबद्दल विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला सरपंचांनी अत्यंत साध्या व समर्पक भाषेत उत्तरे दिली. केवळ वर्गात शिक्षण न देता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मैदानात उतरवून लोकशाही आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची माहिती देणाऱ्या माईलस्टोन इंटरनॅशनल स्कुलच्या या शैक्षणिक उपक्रमाचे वंजारवाडी ग्रामस्थांनी आणि पालक वर्गातून मोठे कौतुक होत आहे. या शैक्षणिक दौऱ्यात माईलस्टोन इंटरनॅशनल स्कुलचे संचालक ज्ञानेश्वर तांबे, मुख्याध्यापिका सारिका जगताप, शिक्षक अमोल क्षीरसागर, ज्ञानेश्वर जरांगे, अशोक चौरे, रहमान शेख, अर्चना जोगदंड, अश्विनी काकडे व अमिना भाभी यांच्यासह शाळेतील शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
—
*वंजारवाडीची ही अनोखी वैशिष्ट्ये ठरली विद्यार्थ्यांसाठी कौतुकास्पद*
गावातील ५ प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा जांभूळ, आंबा, नारळ आणि फणसाची झाडे लावली असून तब्बल ७ हजार झाडांना ठिबक सिंचन व विशिष्ट नंबरिंग करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीने स्वतःची पिठाची गिरणी आणि किराणा दुकान सुरू केले आहे. विशेष म्हणजे, ग्रामस्थांना ६ महिन्यांपर्यंत उधारीवर किराणा दिला जातो!, शुद्ध आणि फिल्टर केलेले पिण्याचे पाणी ग्रामस्थांना अवघ्या ५ रुपयात २० लिटर या दराने उपलब्ध करून दिले जाते. एकेकाळी पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या या गावात आता १९ बंधारे बांधले असून तब्बल २५० एकर क्षेत्रावर ऊस पिकवला जातो. गावात प्रत्येक रस्त्यावर हात धुण्याची सोय, ओला-सुका कचरा वेगाने संकलित करण्यासाठी वेगळ्या कचराकुंड्या, उत्तम सांडपाणी व्यवस्था आणि मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. ही अनोखी वैशिष्ट्ये विद्यार्थ्यांसाठी कौतुकास्पद ठरली
—-
*पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे अधिक प्रभावी*
विद्यार्थ्यांना केवळ वर्गातील चार भिंतींच्या आत पुस्तकी ज्ञान देण्याऐवजी प्रत्यक्ष अनुभवातून शिकवणे हे अधिक प्रभावी ठरते. शालेय अभ्यासक्रमात ‘पंचायत राज’ विषय आहेच, परंतु ग्रामपंचायत प्रत्यक्षात कशी कार्य करते, गाव आदर्श कसे बनते आणि लोकसहभागातून विकास कसा साधला जातो, हे मुलांनी वंजारवाडीत प्रत्यक्ष पाहिले. अशा एज्युकेशनल फिल्ड व्हिजिटमुळे विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन समृद्ध होतो आणि त्यांच्यात सामाजिक जाणीव निर्माण होते.
-ज्ञानेश्वर तांबे (संचालक, माईलस्टोन इंटरनॅशनल स्कुल, बीड)



