📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

पावसाअभावी आष्टी, पाटोदा, शिरूर कासार तालुक्यांतील खरीप पिके वाया; शेतकऱ्यांवर अस्मानी संकट

पावसाअभावी आष्टी, पाटोदा, शिरूर कासार तालुक्यांतील खरीप पिके वाया; शेतकऱ्यांवर अस्मानी संकट
सुरेश धस जिवंत आहे शेतकऱ्यांनी घाबरू नये – आ. सुरेश धस यांची ग्वाही
आष्टी (प्रतिनिधी) : पावसाळा संपत आला असतानाही आष्टी, पाटोदा आणि शिरूर कासार तालुक्यांत खरीप हंगामातील पिके पावसाने पाठ फिरवल्याने वाया गेली असून, शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढवले आहे.या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून, प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणी जोर धरत आहे.तर शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये सुरेश धस जिवंत असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही हेक्टरी अनुदान मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही आ. धस यांनी दिली.
आष्टी तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात एकूण ९७ हजार ७६७ हेक्टर क्षेत्रापैकी ६८ हजार ५५० हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली ज्यामध्ये या वर्षी सोयाबीन 38 हजार हेक्टर, उडीद 17 हजार हेक्टर, मूग 1 हजार 900 हेक्टर,मका 8 हजार हेक्टर,बाजरी 6 हजार 300 हेक्टर, कापूस 5 हजार 500 हेक्टर
तूर 15 हजार 500 हेक्टर या प्रमाणे तसेच पाटोदा तालुक्यामध्ये एकूण 58 हजार 913 हेक्टर क्षेत्रात सोयाबीन 51 हजार 487 हेक्टर, तूर 2 हजार 974 हेक्टर,उडीद 1 हजार 595 हेक्टर, कापूस 1 हजार 597 हेक्टर, बाजरी 1260 हेक्टर तर शिरूर कासार तालुक्यात 47 हजार 544 हेक्टर क्षेत्रामध्ये सोयाबीन 7 हजार 240 हेक्टर, कापूस 29 हजार, 202 हेक्टर, उडीद 2 हजार 392 हेक्टर, मूग 786 हेक्टर, बाजरी 1 हजार 509 हेक्टर, मका 557 हेक्टर, तूर 5 हजार 746 हेक्टर क्षेत्रातील पेरणी झालेली आहे मात्र पावसाअभावी आष्टी पाटोदा शिरूर कासार तालुक्यातील सर्व पिके वाया गेली असून येथील फळबागा वाचवण्यासाठी फळबाग धारक शेतकऱ्यांची फळबागांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी अनुदान देण्याची मागणी समोर येत आहे.
तिन्ही तालुक्यांमध्ये सोयाबीन, मूग, उडीद, मका, कापूस,बाजरी,आणि तूर या प्रमुख खरीप पिके पावसाअभावी वाया गेल्याने पेरणीसाठी केलेला खर्चही वसूल होण्याची परिस्थिती राहिली नसल्याचे चित्र आहे.
चौकट 1
*शेतकऱ्यांनी घाबरू नये; सरसकट हेक्टरी अनुदान मिळवून देऊ* आ. सुरेश धस
दरम्यान, २० ते ३० सप्टेंबरदरम्यान पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र, पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांनी हतबल होऊन इतरत्र कामाला जाण्याचा विचार करू नये. “आता कसं होईल, काय होईल, या चिंतेत शेतकऱ्यांनी राहू नये. सुरेश धस जिवंत आहे. शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. जे हेक्टरी अनुदान मिळेल, ते सरसकट मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. विनाकारण मनात भीती बाळगू नका,” असे आवाहन आ. सुरेश धस यांनी केले आहे.शेतकऱ्यांनी संकटाच्या काळात धीर न सोडता पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाकडून शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाहीही आ. धस यांनी दिली.
चौकट 2
जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर!
आष्टी, पाटोदा आणि शिरूर कासार तालुक्यांत पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याने त्याचा थेट परिणाम जनावरांच्या चाऱ्यावर झाला आहे. दुभत्या जनावरांची संख्या अधिक असलेल्या तसेच जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हिरवा चारा आणि कडबा उपलब्ध होत नसल्याने पशुपालकांची चिंता वाढली आहे. दुग्ध व्यवसायावर अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या उत्पन्नावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने चारा डेपो सुरू करून पशुपालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
Back to top button