बीड
आपेगाव उपकेंद्रात ५ एमव्हीए क्षमतेचे नवीन रोहित्र कार्यान्वित; आ. नमिता मुंदडांच्या पाठपुराव्याला यश

आपेगाव उपकेंद्रात ५ एमव्हीए क्षमतेचे नवीन रोहित्र कार्यान्वित; आ. नमिता मुंदडांच्या पाठपुराव्याला यश
अंबाजोगाई प्रतिनिधी: तालुक्यातील आपेगाव येथील ३३ केव्ही उपकेंद्रामध्ये आमदार नमिता अक्षय मुंदडा यांच्या विशेष प्रयत्नातून आणि महावितरण कंपनीकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ५ एमव्हीए क्षमतेचे नवीन रोहित्र बसवण्यात आले आहे. या नवीन यंत्रणेमुळे आपेगावसह परिसरातील पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना आता उच्च दाबाने आणि प्रामुख्याने दिवसा वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वीज प्रश्नामुळे त्रस्त असलेल्या शेतकरी वर्गाला या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला असून संपूर्ण परिसरात समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
आपेगाव आणि आसपासच्या गावांमधील शेती प्रामुख्याने सिंचनावर अवलंबून आहे, मात्र जुन्या यंत्रणेवर येणाऱ्या अतिरिक्त ताणामुळे वीज पुरवठ्यात वारंवार खंड पडत होता. कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपंपांचे नुकसान होण्याचे प्रमाणही वाढले होते. ही समस्या लक्षात घेऊन आमदार नमिता मुंदडा यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या उपकेंद्राची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यांच्या या मागणीची दखल घेत प्रशासनाने नवीन रोहित्र बसवण्यास मंजुरी दिली आणि त्याचे काम आता पूर्ण झाले आहे.
या नवीन ५ एमव्हीए क्षमतेच्या रोहित्रामुळे विद्युत पुरवठ्यातील तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून आता पूर्ण दाबाने वीज मिळणार आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात जावे लागू नये यासाठी दिवसा वीज उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. यामुळे जंगली प्राण्यांचा धोका आणि रात्रीच्या वेळी होणारी गैरसोय टळणार आहे. आ. नमिता मुंदडा यांच्या कार्यतत्पतेबद्दल शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री पंकजाताई मुंडे आणि राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांचे आमदार नमिता मुंदडा यांनी आभार मानले आहेत.



