बीड

रोडवर आडवून डोळ्यात चटणी टाकून सोनारास लुटणारी दरोडेखोरांची टोळी अखेर जेरबंद

रोडवर आडवून डोळ्यात चटणी टाकून सोनारास लुटणारी दरोडेखोरांची टोळी अखेर जेरबंद
*स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी*
केज/प्रतिनिधी
रोडवर आडवून डोळ्यात चटणी टाकून सोनारास लुटणारी दरोडेखोरांची टोळी अखेर स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे.स्थानिक गुन्हे शाखेने दमदार कामगिरी केली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ रोजी युसुफ वडगाव पोलीस ठाणे येथे गु.र.नं.४६/२०२६ कलम ३०९(६) बी.एन.एस.प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर  फिर्यादी हे सोनार असून ते सोने विक्री करण्यासाठी जुन्या डिघोळआंबा येथे एका मोटरसायकलवरून  बसून जात असताना केज तालुक्यातील होळ ते डिघोळआंबा येथील दर्ग्याजवळ अज्ञात दोन मोटार सायकलवर चार जणांनी येऊन फिर्यादी सोनारांची मोटरसायकल आडवून त्यांच्या डोळ्यात तिखट चटणी टाकून व त्यांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करून हातातील सोन्याची पिशवी जबरदस्तीने हिसकावून घेऊन पळून गेले होते. व्यापारी सोनार यांच्या फिर्यादीवरून युसुफ वडगाव पोलीस ठाणे येथे गु.र‌.नं.४६/२०२७ कलम ३०९(६) बी.एन.एस.नुसार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अज्ञात आरोपीचा शोध हा युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शोध घेत होते परंतु आरोपीचा ठावठिकाणा लागत नव्हता.
वरील नमूद गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करत असताना एकूण जवळपास ५० पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले होते.
सदर सीसीटीव्ही फुटेज मधील संशयित इसमांची माहिती घेणे सुरू असताना दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमी मिळाली की, सदर सीसीटीव्ही फुटेज मधील संशयित इसम नामे रोहित रणजीत धिमधीमे हा असून तो आंबेजोगाई बसस्थानक लगत राज मेडिकल जवळ उभा असल्याची माहिती मिळाल्यावर त्यास पथकाने ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा सुदाम गणपत सोनवणे रा. डिघोळअंबा ता. धारूर व पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार वीरसिंग रीसपालसिंग टाक रा.आंबेजोगाई यांच्या सांगण्यावरून त्यांचे इतर साथीदार नामे अभिषेक अशोक घाटूळ रा. कन्हेरवाडी ता. परळी, कानिफनाथ विलास डुरकर रा.क्रांतीनगर आंबेजोगाई, यशोदीप कल्याण किर्तन रा.सातेफळ ता. आंबेजोगाई यांच्यासह मिळून केला असल्याचे सांगितले.
सदर गुन्ह्यात एकूण सहा आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहेत. सदर प्रकरणातील आरोपी पकडण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
तसेच आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटरसायकली त्यांची अंदाजे किंमत १ लाख ५० हजार रुपये, ६ मोबाईल ज्याची अंदाजे किंमत ९० हजार रुपये यासह सोनाराचे जबरदस्तीने चोरून नेहलेले सोन्याचे दागिने ज्याची अंदाजे किंमत ३ लाख रुपये असे एकूण ५ लाख ४० हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
वरील सहा आरोपी व जप्त केलेला मुद्देमाल हा पुढील तपास कामी पोलीस ठाणे युसुफ वडगाव यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
सदरील कामगिरी ही पोलीस अधीक्षक नवनीत काॅवत, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम, स्थानिक गुन्हे शाखेचे शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलीस हवालदार जफर पठाण, महेश जोगदंड, दिलीप गीते, मारुती कांबळे, दीपक खांडेकर, गणेश मराडे, विकी सुरवसे यांनी केली आहे.
Back to top button