बीड
ज्ञान, शिस्त आणि परिश्रम हेच यशाचे खरे सूत्र – प्राचार्य संदीप काळे

ज्ञान, शिस्त आणि परिश्रम हेच यशाचे खरे सूत्र – प्राचार्य संदीप काळे
नर्मदा कनिष्ठ महाविद्यालयात नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत
पैठण | किरण काळे
जायकवाडी उत्तर येथील नर्मदा कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावी कला व विज्ञान शाखेच्या नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील नव्या पर्वाची सुरुवात प्रेरणादायी वातावरणात व्हावी, या उद्देशाने आयोजित स्वागत समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासह शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप काळे, प्रा.चेतन गर्जे, प्रा.साईनाथ भिसे, प्रा.उद्धव ताठे, प्रा.चंद्रशेखर साळवे, प्रा.स्वाती धुमाळ, प्रा.मनीषा पाचारणे तसेच अजय सातपुते यांनी नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नव्या शैक्षणिक प्रवासाचा उत्साह आणि आनंद स्पष्टपणे दिसून आला.
स्वागत समारंभासाठी इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी वर्गांची आकर्षक सजावट केली होती.रंगीबेरंगी फलक, स्वागत संदेश आणि सुंदर सजावटीमुळे महाविद्यालय परिसर उत्सवी वातावरणाने नटला होता.वरिष्ठ विद्यार्थ्यांनी नवागत विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनाची ओळख करून देत त्यांना आवश्यक सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली.
यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य संदीप काळे म्हणाले, “विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारे स्वेच्छेने नर्मदा कनिष्ठ महाविद्यालयाची निवड केली आहे.ही निवड महाविद्यालयाविषयी विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा असलेला विश्वास दर्शवते. गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्त आणि परिश्रम यांच्या बळावरच विद्यार्थी जीवनात यशाचे शिखर गाठू शकतात. ज्ञान, शिस्त आणि परिश्रम हेच यशाचे खरे सूत्र आहे.”
ते पुढे म्हणाले की, नर्मदा कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले जाते.शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच बौद्धिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविले जातात. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालून त्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी महाविद्यालय सदैव कटिबद्ध राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास इयत्ता अकरावी व बारावीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरणात झालेल्या स्वागत समारंभामुळे नवप्रवेशित विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात झाली.


