बीड

श्रीवर्धनच्या ‘ब्लू फ्लॅग’ दर्जाची अब्रू धुळीस! जागतिक मानाच्या किनाऱ्याचे झाले ‘कचराकुंडीत’ रूपांतर

श्रीवर्धनच्या ‘ब्लू फ्लॅग’ दर्जाची अब्रू धुळीस! जागतिक मानाच्या किनाऱ्याचे झाले ‘कचराकुंडीत’ रूपांतर
लाखोंची बीच क्लिनिंग मशीन धुळखात; प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेवर संताप
श्रीवर्धन (संदेश घोलप)
आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानाचा ‘ब्लू फ्लॅग’ दर्जा प्राप्त झालेल्या श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी ओळखल्या जाणाऱ्या या किनाऱ्यावर सर्वत्र प्लास्टिक कचरा, फुटलेल्या बिअरच्या बाटल्या, सडलेले खाद्यपदार्थ आणि घाणीचे साम्राज्य पसरले असून, प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारामुळे ‘ब्लू फ्लॅग’ दर्जालाच गालबोट लागल्याची तीव्र भावना पर्यटक आणि नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
‘ब्लू फ्लॅग’ मानांकन टिकवण्यासाठी स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, पर्यटक सुरक्षा आणि व्यवस्थापनाचे कठोर निकष सातत्याने पाळावे लागतात. मात्र श्रीवर्धन किनाऱ्यावरील प्रत्यक्ष चित्र या निकषांना हरताळ फासणारे आहे. किनाऱ्यावरील धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावर अनेक दिवसांपासून साफसफाईच झालेली नसून संपूर्ण परिसर वाळू आणि कचऱ्याखाली गाडला गेला आहे.
मद्यपींच्या वावरामुळे किनाऱ्यावर फुटलेल्या काचेच्या बाटल्या, प्लास्टिकचे ग्लास आणि रिकाम्या बाटल्यांचा खच पडला आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
लाखोंची आधुनिक मशीन ‘शोभेची वस्तू’
नगरपरिषदेकडून लाखो रुपये खर्च करून अत्याधुनिक बीच क्लिनिंग मशीन खरेदी करण्यात आली होती. ‘ब्लू फ्लॅग’ दर्जा टिकवण्यासाठी या मशीनचा नियमित वापर अपेक्षित असताना ती सध्या धुळखात पडल्याचे दिसून येत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, “कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही प्रत्यक्षात स्वच्छतेची कामे होत नाहीत. मशीन केवळ दाखवण्यासाठी ठेवली आहे का?” असा सवाल उपस्थित होत आहे.
“प्रशासकांचा काळच बरा होता”
नगरपरिषदेवर प्रशासकीय राजवट असताना स्वच्छतेची परिस्थिती तुलनेने चांगली होती, अशी प्रतिक्रिया स्थानिक व्यावसायिक आणि नागरिक व्यक्त करत आहेत. नुकत्याच निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर निष्क्रियतेचे आरोप होत असून, निवडणुकीतील आश्वासने हवेतच विरल्याची भावना नागरिकांत आहे.
“जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी प्रत्यक्ष किनाऱ्यावर येऊन परिस्थिती पाहणार तरी कधी?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
पावसाळ्यापूर्वी धोका वाढला
कोकणात लवकरच मुसळधार पावसाळा सुरू होणार आहे. त्यापूर्वी किनाऱ्यावरील प्लास्टिक व काचेचा कचरा हटवला नाही, तर तो समुद्रात वाहून जाऊन सागरी जीवसृष्टीसाठी मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.
मुख्याधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
“कचरा उचलण्याच्या कामाची वर्क ऑर्डर नुकतीच देण्यात आली आहे. लवकरच कामगार रुजू होतील आणि साफसफाई सुरू केली जाईल.”
Back to top button