“अवयवदान – जीवनाची संजीवनी, अमूल्य वारसा!” गुरुमाऊली आयुर्वेद महाविद्यालयाच्या उपक्रमातून समाजात जागवली ‘जीवनदानाची’ ज्योत

“अवयवदान – जीवनाची संजीवनी, अमूल्य वारसा!”
गुरुमाऊली आयुर्वेद महाविद्यालयाच्या उपक्रमातून समाजात जागवली ‘जीवनदानाची’ ज्योत
सुहास सावंत / माजलगाव:-“आपले जीवन संपले तरी दुसऱ्याचे जीवन वाचू शकते… हेच अवयवदानाचे खरे सार!” — या संदेशाने गुंजलेल्या वातावरणात परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयात अवयवदानाबाबत भव्य जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारत सरकारच्या “अवयवदान – जीवन संजीवनी अभियान” अंतर्गत ३ ते १५ ऑगस्ट २०२५ दरम्यान राबवल्या जाणाऱ्या या अभियानाच्या निमित्ताने शरीर रचना विभागाच्या वतीने हा प्रेरणादायी कार्यक्रम पार पडला.
दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने सुरू झालेल्या या सोहळ्यात मान्यवरांची उपस्थिती लाभली. मुख्य मार्गदर्शक प्रा. डॉ. संतोष वामन शिंदे (विभागप्रमुख, वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, नाशिक) यांनी अवयवदानाचे वैज्ञानिक, सामाजिक, वैद्यकीय व कायदेशीर पैलू अचूकपणे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले, “अवयवदान ही केवळ दानशूरता नाही, तर दुसऱ्याच्या जीवनात नवी पहाट फुलवणारा अद्वितीय संस्कार आहे.”
प्रा. डॉ. शिवरत्न शेटे यांनी अवयवदान प्रक्रियेतील कायदे व नैतिकतेवर भाष्य करत विद्यार्थ्यांच्या मनात सेवा, करुणा व जबाबदारीची जाणीव दृढ केली.
या उपक्रमासाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. अमित बिंदू सर, प्रा. वांडरे सर, प्राचार्या डॉ. जयश्री पाटील मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. प्रभावी नियोजन व समन्वयाची जबाबदारी डॉ. अतुल बिर्ला आणि डॉ. साबेर शेख यांनी समर्थपणे पार पाडली.
विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी यांचा उत्स्फूर्त सहभाग हा या उपक्रमाचा सर्वात प्रेरणादायी क्षण ठरला. कार्यक्रमाच्या अखेरीस चर्चासत्रात उपस्थितांनी स्वतःला “अवयवदानासाठी तयार” अशी प्रतिज्ञा केली आणि आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.
“मृत्यू अपरिहार्य आहे… पण अवयवदानाने आपण मृत्यूला हरवून शेकडो जिवांना नवी उमेद देऊ शकतो” — हा संदेश घेऊन हा उपक्रम सर्वांच्या मनात अमिट ठसा उमटवून गेला.


