बीड

कापूस विक्रीसाठी कपास किसान पोर्टलवरील नोंदणीची तारीख वाढवून देण्यात यावी-आ. नमिता मुंदडा यांची मागणी

कापूस विक्रीसाठी कपास किसान पोर्टलवरील नोंदणीची तारीख वाढवून देण्यात यावी-आ. नमिता मुंदडा यांची मागणी

*अंबाजोगाई (प्रतिनिधी)-बालाजी देशमुख*
सीसीआय केंद्रावर कापूस विक्रीसाठी ‘कपास किसान’ पोर्टलवरील शेतकरी नोंदणीची ३१ डिसेंबरची अंतिम तारीख एक महिन्यांनी वाढवून देण्यात यावी अशी मागणी आ. नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
यासंदर्भात आ. नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी सध्या अत्यंत अडचणीच्या परिस्थितीत सापडलेला आहे. यंदा समाधानकारक उत्पादन झाले असले तरी खुल्या बाजारात कापसाला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाच्या सीसीआय (कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया) मार्फत होणाऱ्या कापूस खरेदीकडे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर कल आहे. मात्र प्रत्यक्षात सीसीआय कडून कापूस विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
सीसीआय खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी ‘कपास किसान’ या ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नोंदणीनंतर संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीकडून अप्रूव्हल मिळाल्यावरच शेतकऱ्यांना प्रत्यक्ष विक्रीची संधी मिळते. ही प्रक्रिया अत्यंत संघ व क्लिष्ट असल्याचे शेतकरी त्रस्त आहेत. अनेक ठिकाणी पोर्टलवर तांत्रिक अडचणी येत असून वारंवार नोंदणी अर्धवट राहते. तसेच बाजार समित्यांकडून अप्रूव्हल देण्यास विलंब होत असल्याने हजारो शेतकरी नोंदणी असूनही प्रत्यक्ष विक्रीपासून वंचित आहेत.
कापूस विक्रीसाठी नोंदणीची अंतिम तारीख ३१ डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे. मात्र आजच्या घडीला अजूनही मोठ्या प्रमाणावर कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. अनेक शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, तर काही ठिकाणी ‘कपास किसान’ पोर्टल अपेक्षित पद्धतीने चालत नसल्यामुळे नोंदणीच होऊ शकलेली नाही. अशा परिस्थिती ३१ डिसेंबरनंतर नोंदणी बंद करण्यात आली, तर असंख्य शेतकरी सीसीआय खरेदीपासून कायमचे वंचित राहतील.
नोंदणी बंद झाल्यास शेतकऱ्यांना नाईलाजाने खुल्या बाजारात अत्यंत कमी दराने कापूस विकावा लागेल. हे दर हमीभावापेक्षा खूपच कमी असून याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होणार आहे. शासनाने हमीभाव जाहीर करूनही प्रत्यक्षात शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार नसेल, तर ही बाब शेतकऱ्यांवर मोठा अन्याय करणारी ठरेल. आधीच वाढता उत्पादन खर्च, कर्जबाजारीपणा व बाजारातील अनिश्चितता यामुळे शेतकरी अडचणीत असताना अशी परिस्थिती अधिकच गंभीर ठरणारी आहे. त्यामुळे सीसीआय कापूस खरेदीसाठी ‘कपास किसान’ पोर्टलवरील शेतकरी नोंदणीची अंतिम तारीख एक महिन्याने वाढवूनदेणे अत्यंत गरजेचे आहे.
तरी वरील सर्व बाबींचा सहानभूतीपूर्वक विचार करून सीसीआय कापूस खरेदीसाठी ‘कपास किसान’ पोर्टलवरील शेतकरी नोंदणीची अंतिम तारीख एक महिन्याने वाढवूनदेणे बाबत आदेश करण्यात यावेत अशी मागणी आ.
नमिता अक्षय मुंदडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे.

Back to top button