बीड

अमेरिका इस्त्रायलच्या इराणवरील हल्ल्याचा प्रगतिशील लेखक संघाकडून निषेध!

अमेरिका इस्त्रायलच्या इराणवरील हल्ल्याचा
प्रगतिशील लेखक संघाकडून निषेध!

मुंबई राष्ट्रीय परिषदेसाठी साहित्यिक सहभागी होणार!
——————————————————————
बीड  (दिनांक 16 मार्च): अमेरिका इस्त्रायलने इराणसारख्या सार्वभौम देशावर हल्ला करून त्या देशाचे प्रमुख, अनेक निरपराध नागरिक व एकशे पासष्ट कोवळ्या मुलांची हत्या केली त्याचा प्रगतिशील लेखक संघाने निषेध केला आहे.
बशीरगं येथे झालेल्या प्रगतिशील लेखक संघाच्या बैठकीत हा ठराव घेण्यात आला. प्रगतिशील लेखक संघाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार कदम अध्यक्षस्थानी होते. लेखक संघाचे जिल्हा सचिव प्रो. डॉक्टर मनोहर सिरसाट व जेष्ठ साहित्यिक प्रा. लक्ष्मण गुंजाळ यांची मंचावर उपस्थिती होती. प्रगतिशील लेखक संघ स्थापनेची नव्वद वर्षे आणि क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले जयंती द्वीशताब्दी वर्षा निमित्त मुंबई येथे प्रगतिशील लेखक संघाची कौन्सिल सभा आणि राष्ट्रीय संमेलन आयोजित करण्यात आले आहे त्याच्या तयारीसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.
वाढता जातीय द्वेष, असहिष्णुता,अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील निर्बंध आणि विवेकवादी परंपरेवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नव्वद वर्षाची संघर्षाची तेजोमय परंपरा असलेल्या प्रगतिशील लेखक संघाच्या राष्ट्रीय संमेलनात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. आगामी काळात बीड जिल्ह्य़ातील प्रागतिक साहित्यिकांचा मेळावा आयोजित करून विविध साहित्यिक उपक्रम राबविण्याचे यावेळी ठरविण्यात आले. बैठकीत अमेरिका इस्त्रायलच्या युद्धखोरीचा आणि त्यांनी इराणवर केलेल्या हल्यांचा निषेध करण्यात आला. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व कुसुमाग्रज अध्यासनातर्फे दिला जाणारा ‘विशाखा काव्य पुरस्कार तृतीय ‘ प्रगतिशील कवी बाळासाहेब नागरगोजे यांच्या ‘युध्द पेटले आहे!’ या काव्यसंग्रहास जाहीर झाला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. बैठकीचे प्रास्ताविक प्रलेसचे कोषाध्यक्ष तथा निसर्गकवी अभिमान खरसाडे यांनी केले. बैठकीस कॉम्रेड नामदेव चव्हाण,बाबा बडे, ॲड भीमराव चव्हाण, डी. जी. तांदळे,भाग्योदय घाटे, उज्वला डोंगरे, दादासाहेब सादोळकर, निळूभाऊ सावरगेकर, रमेश गायकवाड, प्रा अशोक कांबळे, भाग्योदय घाटे आदि साहित्यिक व साहित्यप्रेमींची उपस्थिती होती.

Back to top button