📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

नऊ  वर्षाच्या बालकाचे किडनी प्रतिरोपण यशस्वी, मराठवाडा शिक्षक संघाची मदत; श्रीमती घायाळ यांनी व्यक्त केली कृतज्ञता!

नऊ  वर्षाच्या बालकाचे किडनी प्रतिरोपण यशस्वी, मराठवाडा शिक्षक संघाची मदत; श्रीमती घायाळ यांनी व्यक्त केली कृतज्ञता!
     शासनाने निवृत्ती वेतन नाकारलेल्या शिक्षिका  सरोजिनी घायाळ यांनी किडनी देवून नातवाचे प्राण वाचविले!

बीड (दि 18): सेवानिवृत्त शिक्षिका, श्रीमती सरोजिनी घायाळ यांचा नऊ वर्षाचा नातू संकल्प कृष्णा गायकवाड याची किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. मराठवाडा शिक्षक संघाच्या कार्यकर्त्यांनी मदत केल्यानेच शस्त्रक्रिया करणे शक्य झाल्याची भावना व्यक्त करून श्रीमती घायाळ यांनी संघटनेप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की श्रीमती सरोजिनी घायाळ संत तुकाराम प्राथमिक विद्यालय, बीड येथून सेवानिवृत्त झाल्या. 2005 नंतर शंभर टक्के अनुदानावर आल्यामुळे त्यांना पेन्शन नाही, शासनाची कसली मदत नाही, घरात कोणी नोकरीला नाही, खाजगी काम-धंदा करुन  जेमतेम चरितार्थ  भागविणारा मुलगा, नातु सहा महिन्याचा होता,तेंव्हापासून आजारी! अशा दुर्धर प्रसंगास त्या धिरोदात्तपणे सामोरे जात होत्या. नातवाची किडनी प्रत्यारोपण करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यासाठी मुलगा कृष्णा व त्यांची धडपड चालू होती. दिर्घकाळ विनाअनुदानित सेवा, पतीचे अकाली निधन व पेन्शन पासून वंचित राहिल्याने आर्थिकगणितजुळत नव्हते. त्यांनी मराठवाडा शिक्षक संघाचे सरचिटणीस राजकुमार कदम व  मार्गदर्शक प्राचार्य डी. जी. तांदळे यांना बोलावून आपल्या व्यथा बोलून दाखवल्या. त्यांची परिस्थितीत पाहून राजकुमार कदम व डी. जी. तांदळे यांनी मदत जाहीर करून मराठवाडा शिक्षक संघाच्या कार्यकर्त्यांना मदतीचे आवाहन केले. मराठवाडा शिक्षक संघाच्या कार्यकर्त्यांनी त्यास प्रतिसाद देत मदत केली, त्यामुळे आवश्यक निधी जमा झाला. त्यामुळे संकल्प कृष्णा गायकवाड या बालकास 63 वर्षाच्या शिक्षिका आजीने आपल्या एका किडनीचे दान दिले.  ‘कमलनयन बजाज हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर’ येथे  दि 21.7.2025 रोजी किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. सेवानिवृत्त शिक्षका श्रीमती सरोजिनी घायाळ व त्यांचा नातू संकल्प यांची तब्येत चांगली आहे.
किडनी प्रतिरोपण यशस्वी होवून बीड येथे परतल्या नंतर घायाळ कुटुंबीयांनी मराठवाडा शिक्षक संघाचे विभागिय सरचिटणीस  प्राचार्य राजकुमार कदम  व मार्गदर्शक  डी. जी. तांदळे यांना घरी बोलावून त्यांचा सत्कार करुन संघटनेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. माझी ओळख पाळख नसताना मराठवाडा शिक्षक संघाच्या कार्यकर्त्यांनी मदत केल्यानेच कृष्णाला जीवदान मिळाल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्याची माहिती मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस गणेश आजबे यांनी दिली आहे.

Back to top button