बीड

खरीप हंगामाच्या यशासाठी समन्वय आवश्यक” – आमदार विलास बापू भुमरे

खरीप हंगामाच्या यशासाठी समन्वय आवश्यक” – आमदार विलास बापू भुमरे

पैठणमध्ये पूर्व नियोजन बैठकीत कृषी व्यवस्थेचा आढावा; शेतकऱ्यांच्या अडचणींवर चर्चा

पैठण | किरण काळे

पंचायत समिती कार्यालय, पैठण येथे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पूर्व नियोजन बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.या बैठकीस कृषी विभागाचे अधिकारी, खत-बियाणे व्यापारी तसेच तालुक्यातील विविध भागांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत आगामी खरीप हंगाम सुरळीत व यशस्वी पार पडण्यासाठी आवश्यक घटकांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बियाणे व खतांची वेळेवर उपलब्धता, साठा व वितरण व्यवस्थेचे नियोजन, तसेच शेतकऱ्यांना दर्जेदार इनपुट्स मिळावेत यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा झाली. संबंधित विभागांनी याबाबत कोणतीही तडजोड न करता काटेकोर अंमलबजावणी करावी, अशा सूचना आमदार विलास बापू भुमरे यांनी दिल्या.

यावेळी तहसीलदार ज्योती पवार,गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड, तालुका कृषी अधिकारी विकास पाटील,पो.नि.महादेव गोमारे,स.पो.नि.निलेश शेळके,स.पो.नि.सचिन पंडित,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भुषण आगाज,उपजिल्हाप्रमुख विनोद बोंबले,उपसभापती संजय लघाने,जिल्हा परिषद सदस्य पोपट औटे,दिलीपनाना जगताप,अभिजित तवार, राजेंद्र वाघमोडे,पंचायत समिती सदस्य सतीश शेळके, दादासाहेब गलांडे,अक्षय गवारे,भरत मुकूटमल,मनोज गायके,सखुताई झारगड,तालुका संघटक ज्योती पठाडे,डि.डी.जाधव, वसंतराव कातबने यांच्यासह आदी प्रमुख अधिकारी व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

पाणी व्यवस्थापन हा बैठकीतील प्रमुख मुद्दा ठरला. पावसाच्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण, सूक्ष्म सिंचन पद्धतींचा अवलंब आणि उपलब्ध जलस्रोतांचा कार्यक्षम वापर यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. पीक नियोजन करताना हवामानातील बदलांचा विचार करून कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या पिकांकडे वळण्याचा सल्लाही देण्यात आला.

यावेळी शेतकऱ्यांनी खतांच्या दरातील वाढ, बोगस बियाण्यांचा प्रश्न, वीजपुरवठ्याची अनियमितता आणि सिंचनाच्या अपुऱ्या सुविधांबाबत प्रशासनासमोर आपली मते मांडली. या सर्व प्रश्नांची गांभीर्याने नोंद घेऊन तातडीने सोडवण्यासाठी संबंधित यंत्रणांना निर्देश देण्यात आले.

प्रशासनाच्या वतीने शेतकऱ्यांना वेळेवर मार्गदर्शन, शासकीय योजनांचा लाभ आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पूर्ण सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही देण्यात आली.

यावेळी आमदार विलास बापू भुमरे  यांनी स्पष्टपणे सांगितले की, “खरीप हंगाम हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून त्याच्या यशस्वितेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना कोणतीही अडचण भासू नये, यासाठी प्रशासनाने सज्ज राहून आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात.”

बैठकीमुळे प्रशासन आणि शेतकरी यांच्यात समन्वय वाढून खरीप हंगाम अधिक नियोजनबद्ध व यशस्वी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Back to top button