बीड

युरिया मिश्रित बोगस पशुखाद्य प्रकरणी तात्काळ कारवाईची मागणी – वसंत मुंडे  

युरिया मिश्रित बोगस पशुखाद्य प्रकरणी तात्काळ कारवाईची मागणी – वसंत मुंडे  

.मुंबई (प्रतिनिधी) – नाशिक जिल्ह्यातील गोदरेज अँग्रोव्हेट पशुखाद्य कारखान्यावर दि. 21/03/2025 रोजी गुन्हा नोंद होऊनही महाराष्ट्र शासनाकडून राजकीय दबावामुळे कारवाई का केली जात नाही, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केला आहे.

एफआयआरमध्ये जोडलेल्या ई-वे बिल व डिलिव्हरी चलनानुसार फेब्रुवारी ते मार्च 2025 दरम्यान गोदरेज युनिटसाठी अनेक तुकड्यांमध्ये टेक्निकल ग्रेड युरियाची खरेदी व वाहतूक करण्यात आली. हा युरिया औद्योगिक वापरासाठी असल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले असून तो पशुखाद्यासाठी अपात्र आहे.

पशुखाद्यामध्ये टेक्निकल ग्रेड युरियाचे बेकायदेशीर मिश्रण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून जनावरांच्या आरोग्यासाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. प्रयोगशाळेच्या निष्कर्षानुसार पशुखाद्याच्या नमुन्यामध्ये युरियाचा वापर झाल्याचे आढळून आले असून त्यामध्ये टीएन 46.06 व बेंझीन द्रावणीय घटक भेसळीत आढळले आहेत.

हे निष्कर्ष ग्लोबल केमिकल मिनरल कंपनी, जातीय केमिकल प्रायव्हेट लिमिटेड व रुद्र ट्रान्सपोर्ट कंपनी यांच्या संशयित बॅच क्रमांक व खरेदी नोंदीशी जुळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधितांनी कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन केल्याने पशुखाद्य, अन्न सुरक्षा व सार्वजनिक सुरक्षा अधिनियमातील कलम 32 (ड), 7, 8, 9 व 10 अंतर्गत गंभीर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत; मात्र अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही.

शेतकऱ्यांना पेरणीच्या काळात युरिया मिळत नाही, मात्र पशुखाद्य तयार करणाऱ्या कारखानदाराला युरियाचा पुरवठा कोण करीत आहे, याची संपूर्ण माहिती शासनाने तपासातून उघड करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या प्रकरणामुळे पशुधनाच्या आरोग्यावर गंभीर धोका निर्माण झाला असून अन्नपदार्थांद्वारे मानवाच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. पशुपालक, दुग्ध संस्था व ग्राहकांचे हित सुरक्षित राहण्यासाठी गोदरेज पशुखाद्य तयार करणारा कारखाना तात्काळ बंद करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

पशुवैद्यकीय व पशुखाद्य सुरक्षा संदर्भातील वैधानिक जबाबदारी, न्यायवैद्यकीय व प्रयोगशाळेतील तपासातील स्पष्ट पुरावे तसेच पशुधन व ग्राहकांच्या आरोग्यावर निर्माण झालेला गंभीर धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने दि. 19 डिसेंबर 2025 रोजी गोदरेज पशुखाद्य युनिट कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश दिले असूनही कारवाई का केली जात नाही, यास पशुसंवर्धन मंत्री, प्रधान सचिव व पशुसंवर्धन आयुक्त जबाबदार असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी पुराव्यासह शासनाकडे निवेदनाद्वारे केला आहे.

Back to top button