📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

कॉपीमुक्त अभियान राबविणाऱ्या शिक्षण विभागाच्या दिव्याखाली अंधार; परळी येथील नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयातील परीक्षा केंद्र बदलल्याची अधिकाऱ्यांना माहितीच नाही — डॉ. गणेश ढवळे

कॉपीमुक्त अभियान राबविणाऱ्या शिक्षण विभागाच्या दिव्याखाली अंधार; परळी येथील नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयातील परीक्षा केंद्र बदलल्याची अधिकाऱ्यांना माहितीच नाही — डॉ. गणेश ढवळे

बीड : (दि. ११)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता १२ वीच्या परीक्षेला दि. १० पासून सुरुवात झाली आहे. बीड जिल्ह्यातील १०३ परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही, कंट्रोल रूम तसेच संवेदनशील केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे देखरेख ठेवून भयमुक्त व कॉपीमुक्त परीक्षा घेण्याचा दावा जिल्हा प्रशासन करत आहे. मात्र प्रत्यक्षात परळी तालुक्यातील नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय प्रकरणामुळे शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

परळी शहरात परीक्षा केंद्र असल्याचे बोर्डाकडे नमूद करण्यात आले असताना प्रत्यक्षात परीक्षा जिरेवाडी येथील शारदा विद्या मंदिर (माध्यमिक व प्राथमिक शाळा) येथे घेण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी परीक्षा घेण्यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याचा आरोप होत आहे. बोर्ड परीक्षा आयोजित करण्यासाठी तब्बल १२० शालेय विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली, यामुळे शिक्षण व्यवस्थेचा गंभीर गैरवापर झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

अधिकाऱ्यांनाच परीक्षा केंद्र बदलल्याची माहिती नाही

या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे परीक्षा केंद्र बदलल्याची माहिती जिल्हा प्रशासन व शिक्षण विभागाला नव्हती. शिक्षण विभागाचे अधिकारी गिरी यांनी याबाबत अज्ञान व्यक्त केल्याने प्रशासकीय हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा उघड झाला आहे.

कॉलेज बोगस; स्वतःची इमारत व अधिकृत सुविधा नाहीत

नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाला स्वतःची अधिकृत इमारत नसून, रहिवासी इमारतीवर कॉलेजचा फलक लावण्यात आला आहे. केवळ दोन शटर असलेल्या खोलीला कॉलेज कार्यालय म्हणून दाखवण्यात आले आहे. शहरात कॉलेज व परीक्षा केंद्र दाखवून ग्रामीण भागात परीक्षा आयोजित करणे हा गंभीर नियमभंग असल्याचे स्पष्ट होत आहे.

दोषींवर कठोर कारवाईची मागणी

या प्रकरणात संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य अतुल दुबे, माध्यमिक मुख्याध्यापक अश्विनी बाळासाहेब वानखेडे, प्राथमिक मुख्याध्यापक अंबादास आघाव, सचिव राजश्री मुंडे आणि सहसचिव प्रदीप शिवाजी खाडे यांच्यावर सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी केली आहे.

शिक्षण विभागातील गैरव्यवहारांचे सत्र सुरूच

यापूर्वी बीड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) गैरव्यवहार प्रकरणात निलंबित झाले असून, विद्यमान शिक्षणाधिकारी (प्राथमिक) थकीत वेतन घोटाळ्यात सहआरोपी म्हणून जामिनावर आहेत. तसेच शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्याविरोधात विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत चौकशी सुरू आहे.

त्यामुळे भयमुक्त व कॉपीमुक्त परीक्षा घेण्याचा दावा करणाऱ्या शिक्षण विभागाचा कारभार ‘दिव्याखाली अंधार’ असल्याची तीव्र प्रतिक्रिया डॉ. गणेश ढवळे यांनी व्यक्त केली असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Back to top button