बीड
पाईपलाइन कामादरम्यान भीषण दुर्घटना; कामगाराचा मृत्यू, एक गंभीर जखमी

पाईपलाइन कामादरम्यान भीषण दुर्घटना; कामगाराचा मृत्यू, एक गंभीर जखमी
बेल्ट तुटल्याने पाईप व माती अंगावर कोसळली; बिडकीन डीएमआयसी प्रकल्पातील निष्काळजीपणा चर्चेत
पैठण / प्रतिनिधी
पैठण तालुक्यातील संत एकनाथ कारखाना लिफ्ट परिसरात सुरू असलेल्या बिडकीन डीएमआयसी पाइपलाइन कामादरम्यान सोमवारी (दि.२७) दुपारी सुमारे ४.३० वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला. पाईप टाकण्याच्या कामावेळी बेल्ट तुटल्याने पाईप व माती अंगावर कोसळून एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा कामगार गंभीर जखमी झाला आहे.
या घटनेत रेवणनाथ आबाजी बोबडे (वय ७०) यांचा मृत्यू झाला असून नकुल बाबासाहेब शेळके (वय ३४, दोघेही रा. बोरगाव, ता. पैठण) हे गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बिडकीन डीएमआयसी प्रकल्पांतर्गत पाइपलाइन टाकण्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. हे काम जायकवाडी धरणाच्या दिशेने सुरू असून सोमवारी नेहमीप्रमाणे संबंधित कामगार सकाळी कामावर हजर झाले होते. दुपारी सुमारे ४.३० वाजण्याच्या सुमारास पोकलेन मशिनच्या सहाय्याने पाईप टाकण्याचे काम सुरू असताना अचानक पाईपला लावलेला बेल्ट तुटला.
त्या वेळी दोघेही कामगार खड्ड्यात उतरून पाईपला ग्रीस लावण्याचे काम करत होते. अचानक मोठा पाईप त्यांच्या अंगावर कोसळला आणि त्याच वेळी मातीचा ढिगाराही त्यांच्या अंगावर पडल्याने दोघेही खाली दबले गेले. घटनेनंतर परिसरातील कामगार आणि शेतकऱ्यांनी तातडीने मदतकार्य सुरू करून माती व पाईप हटवत दोघांना बाहेर काढले.
जखमींना तात्काळ बिडकीन ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रेवणनाथ बोबडे यांना तपासून मृत घोषित केले. गंभीर जखमी नकुल शेळके यांना पुढील उपचारासाठी पैठण एमआयडीसी येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
या घटनेची माहिती पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन मंगळवारी (दि.२८) सकाळी करण्यात येणार असून त्यानंतर बोरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मृत बोबडे यांच्या पश्चात तीन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
दरम्यान, या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. संबंधित यंत्रणेकडून या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.



