बीड

एमएससी बोर्डचा भोंगळ कारभार ; राम मंदिर परिसरातील लाईट समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

एमएससी बोर्डचा भोंगळ कारभार ; राम मंदिर परिसरातील लाईट समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

प्रहार संघटनेचे नय्युमभाई सुभेदार यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

जामखेड प्रतिनिधी –शहरातील श्री राम मंदिर परिसरात वीज तारा आणि पोलवर वाढलेल्या वेलांमुळे लाईट वारंवार बंद पडत आहे. परिणामी या परिसरात रात्रीच्या वेळी अंधार पसरतो असून, नागरिकांना सुरक्षिततेचा मोठा प्रश्न भेडसावत आहे. या समस्येमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

राम मंदिर परिसर हा धार्मिक व सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा भाग असून, येथे दररोज नागरिकांची व भाविकांची वर्दळ असते. मात्र परिसरातील लाईट बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी महिलांना, वृद्धांना आणि विद्यार्थ्यांना ये-जा करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अंधाराचा गैरफायदा घेऊन गैरकृत्य घडण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.

नागरिकांनी ही समस्या वारंवार एमएससी बोर्डकडे आणि संबंधित प्रशासनाकडे मांडली. पण, अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. वीज पोलवर वेल जास्त प्रमाणात वाढल्याने वायरला स्पर्श होऊन लाईट जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु, तक्रारी असूनही त्या काढण्यासाठी कोणताही प्रयत्न प्रशासनाने केला नाही.

या प्रश्नी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष नय्युमभाई सुभेदार यांनी पुढाकार घेत, प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “श्री राम मंदिर परिसरातील लाईट समस्येकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे. अन्यथा प्रहार संघटनेच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात येईल.”

सुभेदार यांनी अधिक स्पष्ट केले की, “नागरिकांच्या सुरक्षिततेशी प्रशासन खेळ खेळत आहे. वारंवार तक्रारी करूनही काहीच हालचाल होत नसेल, तर तीव्र आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही. जर काही अनिष्ट घटना घडली, तर त्यास सर्वस्वी जबाबदार प्रशासनच असेल.”

Back to top button