बीड

विधानपरिषद सभापतींविरोधातील प्रस्ताव मागे; विरोधी पक्षाचा निर्णय

विधानपरिषद सभापतींविरोधातील प्रस्ताव मागे; विरोधी पक्षाचा निर्णय

सभापती महोदय प्रा. राम शिंदे यांना मोठा दिलासा

लोकशाहीच्या सन्मानासाठी मागे घेतली सूचना – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांना पदावरून दूर करण्याची विरोधी पक्षाने दिलेली सूचना अखेर मागे घेण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यासंदर्भात सभापतींना पत्र दिले असून, विरोधी पक्षातील प्रमुख सदस्यांनी या निर्णयावर सहमती दर्शवली आहे.

विरोधी पक्षाने दि. 19 मार्च 2025 रोजी विधानपरिषद सभापतींविरोधात सूचना दिली होती. सभागृहात घडलेल्या काही घटनांमुळे विरोधकांचा हक्क अबाधित राहिलेला नाही, तसेच सभागृहाची प्रतिष्ठा राखली जावी, या उद्देशाने हा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, दि. 21 मार्च 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सरकारने समाधानकारक आश्वासने दिल्याने हा प्रस्ताव मागे घेण्याचा निर्णय झाला.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिलेल्या पत्रावर एकनाथराव खडसे, अॅड. अनिल परब, अशोक ऊर्फ भाई जगताप, अभिजित वंजारी, सचिन अहिर, सुनील शिंदे, राजेश राठोड, प्रज्ञा सातव आणि जगन्नाथ अभ्यंकर यांच्यासह अनेक सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सभागृहात खेळीमेळीचे वातावरण रहावे आणि लोकशाही प्रक्रियेचा सन्मान राखला जावा, या हेतूने हा निर्णय घेण्यात आल्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले आहे.आज दिनांक 26 मार्च, 2025 रोजी मा.सभापती महोदयांना विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र विधानपरिषद, श्री. अंबादास दानवे यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

Back to top button