स्व.दिगंबराव पेटकर आश्रमशाळेत ई-लर्निंग संचांचे डॉ.संगीता शिंदे (बोंडे) यांच्या हस्ते लोकार्पण

पंकज हिरुळकर जिल्हा प्रतिनिधी
अंजनगाव सुर्जी: ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणप्रवाहाशी जोडण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत स्व. दिगंबरराव पेटकर प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, अंजनगाव सुर्जी येथे दोन अत्याधुनिक ई-लर्निंग संचांचे लोकार्पण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या खासदार स्थानिक विकास निधीतून हे ई-लर्निंग संच उपलब्ध करून देण्यात आले असून, यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेला तंत्रज्ञानाची भक्कम जोड मिळणार आहे.
विद्यार्थी हा शिक्षणव्यवस्थेचा केंद्रबिंदू मानून तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्यास शिकण्याची गुणवत्ता अधिक वाढते, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. शाळेतील वर्गखोल्यांमध्ये डिजिटल बोर्ड व ई-लर्निंग प्रणालीच्या माध्यमातून दृकश्राव्य पद्धतीने अध्यापन सुलभ होणार असून, अभ्यासातील संकल्पना विद्यार्थ्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचण्यास मदत होणार आहे.
उद्घाटनप्रसंगी भाजपा शिक्षक आघाडीच्या तसेच शिक्षण संयोजिका डॉ. संगीता शिंदे (बोंडे), नगराध्यक्ष अविनाश गायगोले, संस्थेचे अध्यक्ष प्रवीण पेटकर, कोषाध्यक्ष सविता प्रविण पेटकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, पालकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी डॉ. संगीता शिंदे (बोंडे) यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, शिक्षण क्षेत्रात गुणवत्तापूर्ण बदल घडवण्यासाठी डिजिटल साधनांचा वापर काळाची गरज आहे. विभागातील शाळा तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, असेही त्यांनी नमूद केले. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
शाळा व्यवस्थापनाने खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत भविष्यातही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल, असे स्पष्ट केले.



