उपमहाराष्ट्र केसरी बबन काशिद यांना प्रतिष्ठित गंगाई – बाबाजी राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

उपमहाराष्ट्र केसरी बबन काशिद यांना प्रतिष्ठित गंगाई – बाबाजी राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
जामखेड प्रतिनिधी :
आष्टी – भगवान महाविद्यालयातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित गंगाई-बाबाजी राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार २०२४–२५ यंदा जामखेड तालुक्यातील सारोळा येथील उपमहाराष्ट्र केसरी बबन (काका) काशिद यांना जाहीर झाला आहे. क्रीडा क्षेत्रातील सातत्यपूर्ण योगदान, युवा पिढीला मिळालेली प्रेरणा आणि क्रीडा विकासासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याची माहिती पुरस्कार निवड समितीचे प्रमुख प्राचार्य डॉ. दत्तात्रय वाघ यांनी या निवडीची पत्राद्वारे देण्यात आली आहे.
हा पुरस्कार प्रदान सोहळा दि.१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वा. भगवान महाविद्यालय, आष्टी येथे होणार असून, कार्यक्रमास महाविद्यालयाचे अध्यक्ष मा. आ. भिमराव धोंडे साहेब तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. दत्तात्रय वाघ यांनी केले आहे.माजी आमदार, शिक्षणमहर्षी भीमराव धोंडे साहेब यांच्या मातापित्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो.
सदर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उपमहाराष्ट्र केसरी बबन (काका) काशिद यांचे जामखेड तालुक्यासह जिल्हा व राज्यभर तसेच विविध क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे. गावासह काशिद यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.



