बीड

पालकांनी मुलांवर अपेक्षांचे ओझे लादू नये – अभिनेते सुजित चौरे

पालकांनी मुलांवर अपेक्षांचे ओझे लादू नये – अभिनेते सुजित चौरे

सिंदफणा पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
माजलगाव : विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना आपल्या आवडी, क्षमता आणि कौशल्यांचा विचार करून निर्णय घ्यावा. पालकांनी आपल्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांचे ओझे मुलांवर लादू नये, असे स्पष्ट व मार्गदर्शक मत प्रसिद्ध अभिनेते सुजित चौरे यांनी व्यक्त केले. ते माजलगाव येथील विद्याभुवन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सिंदफणा पब्लिक स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
सविस्तर वृत्त असे की,सिंदफणा पब्लिक स्कूलचे वार्षिक दोन दिवसीय स्नेहसंमेलन ( सप्तरंग – जीवनाच्या विविध छटा) अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. संमेलनाच्या पहिल्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून बीड येथील के. एस. के. महाविद्यालयाचे उपप्राचार्य व नाट्य विभागप्रमुख प्रा. संजय पाटील देवळाणकर उपस्थित होते. तर विशेष अतिथी म्हणून गुरुकुल इंग्लिश स्कूलचे प्राचार्य तसेच सीबीएसई बीड जिल्हा समन्वयक शितल सर्वज्ञ यांनी मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी प्रमुख अतिथी म्हणून अभिनेते सुजित चौरे व संतोष वारे उपस्थित होते. याप्रसंगी माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रकाशदादा सोळंके, शाळेच्या सचिव मंगलताई सोळंके, नीला देशमुख, इगलवुड इंग्लिश स्कूलचे प्राचार्य सत्यजित कांजळकर, दैनिक संकेतचे तालुका प्रतिनिधी विष्णू उगले यांच्यासह पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अभिनेते सुजित चौरे यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधताना आपल्या जीवनप्रवासाबद्दल सांगितले. “मीही बीड जिल्ह्यातील सामान्य कुटुंबातूनच पुढे आलो आहे. मेहनत, जिद्द आणि आई-वडिलांचे आशीर्वाद यामुळेच यश मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचा सदैव सन्मान करावा, त्यांना दुखावू नये. त्याचबरोबर पालकांनीही मुलांच्या आवडीनुसार त्यांना शिक्षण व करिअरची दिशा निवडू द्यावी,” असे आवाहन त्यांनी केले.
स्नेहसंमेलनाच्या दोन्ही दिवशी शाळेचे प्राचार्य अन्वर शेख यांनी शाळेचा सविस्तर वार्षिक अहवाल सादर करत शैक्षणिक, सहशैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील शाळेच्या यशाचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने केले. पहिल्या दिवशी प्राथमिक विभागाचे उपप्राचार्य सौदागर साखरे यांनी तर दुसऱ्या दिवशी माध्यमिक विभागाच्या उपप्राचार्य सुवर्णा शिंगणे यांनी आभार प्रदर्शन केले. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. पहिल्या दिवशी नृत्य शिक्षिका रेखा होके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या हनुमान चालीसावरील नृत्याला पालकांचा विशेष प्रतिसाद मिळाल्याने ते दुसऱ्या दिवशीही सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या विविध कला- गुणांचे दर्शन घडवणारे नृत्य, नाट्य, गीत व समूह सादरीकरण कार्यक्रमांचे विशेष आकर्षण ठरले. याच स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विज्ञान विभाग प्रमुख राजेंद्र सवई यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान प्रदर्शन तर कला विभागाने हस्तकला व कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वैज्ञानिक प्रकल्पांना उपस्थितांनी भरभरून दाद दिली. सध्या वाढत चाललेल्या वृक्षतोडीच्या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धन व पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करणारा विशेष प्रकल्प शिक्षिका कांचन काळे यांनी सादर केला, जो सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला.संपूर्ण स्नेहसंमेलन आनंददायी, प्रेरणादायी व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. स्नेह संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्रदीप बुरकुल, देवेंद्र सोळंके यांनी परिश्रम घेतले.

Back to top button