पोलिस अधीक्षक साहेब शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलंच आहे; निदान बालकांच्या मनातील दहशत तरी संपवा!– डॉ. गणेश ढवळे, लिंबागणेशकर

बीड (दि. ११):बीडचे पोलिस अधीक्षक नवनित कांवत यांनी पवनचक्की कंपन्यांची बाजू घेऊन शेतकऱ्यांची आर्थिक आणि मानसिक पिळवणूक सुरू ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडलं आहे, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केला आहे.
डॉ. ढवळे म्हणाले, “खाकी वर्दीचे ब्रीदवाक्य ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ आहे. या ब्रीदवाक्याचा सन्मान राखण्यासाठी तरी पोलिस प्रशासनाने निष्पाप बालकांवर हल्ला करणाऱ्या गुंडांची शहरभर धिंड काढावी.”
अलीकडेच परळी तालुक्यातील नर्मदेश्वर गुरूकुलात अध्यात्माचे शिक्षण घेणाऱ्या ११ विद्यार्थ्यांवर बेल्ट आणि बांबूने निर्दय मारहाण करण्यात आली. या मुलांच्या अंगावर जखमेच्या खुणा उमटल्या आहेत. हल्लेखोरांनी गुरूकुलातील अध्यात्मिक साहित्य, मृदंगासह शैक्षणिक ग्रंथांची तोडफोड केली असून मोठे नुकसान केले आहे.
“अध्यात्म आणि संस्काराचे धडे घेणाऱ्या बाल वारकऱ्यांवरील हा हल्ला अत्यंत दुर्दैवी आहे. गुरूकुलात हैदोस घालणाऱ्यांनी मुलांच्या मनात निर्माण केलेली भीती आणि दहशत पोलिस अधीक्षक नवनित कांवत यांच्या निदर्शनास येईल काय? आणि त्यांनी या घटनेची कठोर कारवाई करावी का नाही?” असा सवाल डॉ. गणेश ढवळे यांनी उपस्थित केला आहे.



