बीड

तहसीलदार साहेबांची बौद्ध समाजाच्या प्रश्नांबाबत उदासीनता? मानवी हक्क अभियानाने व्यक्त केला तीव्र निषेध

तहसीलदार साहेबांची बौद्ध समाजाच्या प्रश्नांबाबत उदासीनता?

मानवी हक्क अभियानाने व्यक्त केला तीव्र निषेध

जामखेड प्रतिनिधी –जामखेड तालुक्यातील बौद्ध समाजाशी संबंधित अनेक मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तहसील कार्यालयात आज दिनांक ३ जुलै २०२५ रोजी नियोजित बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र तहसीलदार गणेश माळी यांनी नागरिकांना वेळ देऊनही गैरहजर राहिल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली.

बौद्ध समाजाचे शेतमजूर, गायरान धारक आणि विविध गावांतील नागरिक रस्ते, स्मशानभूमी व शेतीशी संबंधित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी नकाशे, पुरावे घेऊन जामखेड तहसील कार्यालयात आले होते. विशेषतः मौजे मोहा, नाहुली, तरडगाव, चौंडी आणि बाळगव्हाण येथून आलेल्या नागरिकांनी सार्वजनिक रस्ते, स्मशानभूमीसाठी रस्त्याची गरज, तसेच पिकांच्या पंचनाम्यांचे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला.

मात्र तहसीलदार साहेबांच्या केबिनला कुलूप असल्याचे आढळून आले. नायब तहसीलदारांकडे विचारणा केल्यानंतर त्यांनी “साहेब बाहेर गेले आहेत” असे सांगितले. मात्र हालचाल रजिस्टरवर कोणतीही नोंद नसल्याने अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप करण्यात आला.

बौद्ध समाजाच्या शिष्टमंडळात सहभागी असलेले नागरिक मजुरी गमावून, बारामती व इतर शहरांतून मोठ्या अपेक्षेने आले होते. परंतु नियोजित बैठकीत तहसीलदार साहेब अनुपस्थित राहिल्यामुळे, समाजातील जीवन-मरणाशी निगडित प्रश्न चर्चे अभावी रखडले गेले. यामुळे संबंधित नागरिकांनी तहसील कार्यालयाच्या बाहेर तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.

मानवी हक्क अभियानाचे जिल्हा सरचिटणीस प्रा. सुनील जावळे यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध करत माननीय जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी (कर्जत) यांच्याकडे या घटनेचा अभिप्राय नोंदवण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “बौद्ध समाज भारताच्या संविधानिक चौकटीत राहून हक्कांची मागणी करतो आहे. हे प्रश्न संविधानातील मूलभूत हक्कांशी संबंधित असून त्यांची सोडवणूक प्रशासनाचे आद्य कर्तव्य आहे.”

प्रा. जावळे यांनी प्रशासनाला विनंती केली आहे की, तहसीलदारांनी याप्रकरणी तातडीने कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा उदासीनतेची पुनरावृत्ती होऊ नये.

Back to top button