बीड
सरकार आणि संस्थाचालकांच्या शिक्षक आणि शिक्षण विरोधी धोरणाने आणखी एका शिक्षकाचा बळी!

सरकार आणि संस्थाचालकांच्या शिक्षक आणि शिक्षण विरोधी धोरणाने आणखी एका शिक्षकाचा बळी!
सोपानराव पालवे सरांची आत्महत्या नाही तर सरकार आणि संस्थाचालका कडून झालेला खूनच!
हाच का तो शिव फुले-शाहू-आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र?
दोषींवर कडक कारवाई करा; सर्व विनाअनुदानित, अंशत: अनुदानित शाळांना अनुदान देऊन शिक्षकांची वेठबिगारी संपवा!- मराठवाडा शिक्षक संघाची मागणी!
बीड (दिनांक 17 एप्रिल): सरकारडून वेतन देण्यात होणारी टाळाटाळ आणि संस्थाचालकांची खंडणीखोरीने आणखीन एका शिक्षकाचा बळी घेतला आहे. परभणी जिल्ह्य़ातील नरसिंह प्राथमिक विद्यालय, मंगरूळ (बु) शाळेतील शिक्षक सोपानराव पालवे यांनी टप्पावाढ मिळण्यास होणारी टाळाटाळ आणि संस्थाचालकांची खंडणीखोरी यामुळे आत्महत्या केली आहे. सरकार आणि संस्थाचालकांनी घेतलेला हा बळी असून संस्थाचालक व शासनावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव व सरचिटणीस राजकुमार कदम यांनी केली आहे.
मराठवाडा शिक्षक संघाने याबाबत दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, दिवंगत शिक्षक सोपानराव पालवे यांची सुसाईड नोट हृदय पिळवटून टाकणारी आहे. विनाअनुदान धोरण हा पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. सोपानराव पालवे चार वर्षांपासून विनावेतन काम करीत होते. साठ टक्के वेतनाची हमी देवून संस्थाचालकांनी पालवे यांच्याकडून वीस लाख रूपये उकळले होते. वडिलोपार्जित शेती विकून त्यांनी हे पैसे दिले होते. वीस टक्के-साठ टक्के पुन्हा वीस टक्के असा वेतनाचा खेळ सुरू होता. त्यासाठी पुन्हा संस्थाचालक पाच लाख रूपये मागत होता. त्यामुळे अगदी नैराश्यातून पालवे यांनी टोकाचे पाऊल ऊचलले. महाराष्ट्रात पाव शतकांपासून सुमारे पासष्ट हजार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विनावेतन वा अंशत: वेतनावर राबवून घेतले जात आहेत. याच लोकांच्या जीवावर देश महासत्ता बनणार आहे. परंतु सुमारे पाव शतकांपासून हे लोक कसे जगत असतील? आपला संसार कसा चालवित असतील याचा जराही विचार ना देशातील राज्यकर्ते करताहेत ना संस्थाचालक ना प्रशासन! यांना जराही लाज कशी वाटत नाही असा प्रश्न उपस्थित करून हाच का तो शिव फुले-शाहू-आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र असा संतप्त सवाल विचारला आहे. दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, सर्व विनाअनुदानित, अंशत: अनुदानित शाळांना शंभर टक्के अनुदान देऊन शिक्षकांची वेठबिगारी संपवावी अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सुर्यकांत विश्वासराव,सरचिटणीस राजकुमार कदम,कोषाध्यक्ष औताडे ए. बी., माजी जिल्हाध्यक्ष डी.जी.तांदळे, जिल्हाध्यक्ष कालिदास धपाटे, जिल्हा सचिव गणेश आजबे , केंद्र कार्यकारिणी सदस्य बंडू आघाव, अशोक मस्कले, नामदेव काळे, सुभाष शेवाळे, विजय गणगे, परवेज देशमुख, व्यंकटराव धायगुडे, हनुमंत घाडगे, गोवर्धन सानप, मनोज सातपुते, तावरे डी. एम, दिनकर शिंदे, युवराज मुरूमकर, विनोद सवासे, अनुप कुसुमकर, श्रीधर गुट्टे, सुमंत गायकवाड, विष्णू वळेकर, प्रदीप चव्हाण, हेमंत धानोरकर, शेख आय. जे, एम.डी. डोळे, अशोक अशोक गाडेकर, शिवाजी ढोबळे, जीवनराव थोरात, बाळासाहेब टिंगरे, दादासाहेब घुमरे, बाळासाहेब काळुशे, शामसुंदर साळुंके, सुनिल जाधव, श्रीनिवास काकडे, हनुमंत गवारे, तुळशीदास सोळंके, जगदिश्चंद्र प्रेमचंद तोष्णीवाल, नदीम युसूफ, पुरुषोत्तम येडे पाटील, संजय गोरे, अलिशान काझी, सुनिल नागरगोजे, बी. टी. खाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.



