बीड

माझाच काय कोणाचाच वाढदिवस साजरा करू नका  — अँड. अजित देशमुख यांचा वाढदिवसानिमित्ताने कार्यकर्त्यांना संदेश

माझाच काय कोणाचाच वाढदिवस साजरा करू नका
— अँड. अजित देशमुख यांचा वाढदिवसानिमित्ताने कार्यकर्त्यांना संदेश
मित्रांनो, नमस्कार, आज १५ एप्रिल, माझा वाढदिवस. पण आपल्याला तो साजरा करायचा नाही.
            जिल्ह्यात वाढलेली अनागोंदी, समाज विघातक कृत्य आणि शासनाच्या भोंगळ कारभारामुळे कोट्यावधींच्या बंद पडलेल्या योजना. या सर्वांचा निषेध नोंदवत मी वाढदिवसानिमित्त कोणताही हार-तुरा, पुस्तक, पेन वगैरे न स्विकारण्याचा निर्णय मी घेतला आहे.
            जन आंदोलनाच्या माध्यमातून आमचे देखील हजारो कार्यकर्ते आहेत. जे आपसात समन्वयाने राहतात. तसं पाहिलं तर सामाजिक कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजराच करू नये, या मताचा मी आहे. आजपर्यंत मी वाढदिवस साजरा करीत नाही. मात्र सोशल मीडियामुळे कार्यकर्त्यांना वाढदिवसाची माहिती मिळते. आणि त्यातून वाढदिवस साजरा केल्याचा प्रकार पुढे येतो.
             सामाजिक काम करताना, जोडले गेलेले हजारो कार्यकर्ते, हे सामान्य परिस्थितीचे असतात. अशा कार्यकर्त्यांचा हार-तुरा, पुस्तक, पेन वगैरेचा खर्च सुद्धा होऊ नये, या मताचा मी आहे. यातून साध्य तर काहीच होत नाही. मात्र कार्यकर्त्यांचा वेळ आणि पैसा वाया जातो. त्यामुळे वाढदिवसाच्या या प्रथा कुठेतरी थांबल्या पाहिजेत. फोन करून अथवा मेसेज टाकून सदिच्छा दिल्या, तरी त्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचतात.
             त्यामुळे वाढदिवस हा खर्चिक ठरू नये, या मताचाही मी आहे. सामाजिक कार्यकर्ते हे केवळ समाज हिताच्या कामाच्या उद्देशाने एकत्र आलेले असतात. त्यांना परस्परांपासून कुठल्याही स्वार्थ नसतो. त्यामुळे अशा अपेक्षा ठेवणे देखील चुकीचे असते.
        जिल्ह्यात जलजीवन योजना असेल अथवा अन्य कोणत्याही योजना. त्या सध्या ७० ते ८०% च्या वर बंद पडलेल्या आहेत. कामावर काही लाख, कोटींचा खर्च झालेला आहे. मात्र पुढचा पैसा मिळत नसल्यामुळे कामे बंद आहेत, हे जनतेचे नुकसान आहे.
       त्याचप्रमाणे कधी नव्हे एवढी अराजकता जिल्ह्यात माजली आहे. सर्वसामान्य या गोष्टीचा तीव्र निषेध करतात. मात्र राजकारणातली गुंडागिरी. भ्रष्टाचार आणि अन्य कारणांमुळे सामान्य जनता त्रस्त झालेली आहे. जिल्ह्यातील हे वातावरण गढूळ होण्यास जे कारणीभूत आहेत, त्यांना अजूनही याचे काही देणे घेणे आहे, असे वाटत नाही.
          शासनाच्या विचारपूर्वक न घेतलेल्या निर्णयामुळे शासनाकडे निधी उपलब्ध राहिलेला नाही. म्हणून कित्येक योजना बारगळल्या आहेत. त्याचप्रमाणे नवीन योजनांना पैसा देण्यासाठी शासनाकडे पैसा देखील नाही. शासन आता किती हजार कोटींचं कर्ज जनतेच्या डोक्यावर ठेवणार ? हे कळत नाही.
           कुचकामी धोरणे आणि वाढता भ्रष्टाचार या सर्वाला कारणीभूत आहे. यावर सामान्य जनतेमध्ये विचार मंथन होणे गरजेचे आहे. मात्र सामान्य जनतेला तेवढा वेळ नसल्याने विचारमंथन होत नाही. आणि म्हणून शासन स्तरावर काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी, त्याचबरोबर सर्व स्तरातील लोकप्रतिनिधी यांना जनता जाब विचारू शकत नाही.
         या सर्व बाबी निषेध नोंदवने योग्य आहे. सरकार कोणाचेही असो, ते व्यवस्थित चालले पाहिजे. जिल्ह्यात राजकारणी कोणीही असो, राज्यातील राजकारणी कोणीही असो, ते देखील व्यवस्थित चालले पाहिजेत. त्याचप्रमाणे जनतेची कामे रेंगळली तर जनतेचे नुकसान होते. त्यामुळे प्रशासन गतिमान असायला हवे.
            मात्र प्रशासनाने जनतेच्या कामाऐवजी दुसरीकडेच गती घेतल्याचे अनेक वेळेला स्पष्ट झालेले आहे. या सर्व बाबींचा निषेध नोंदवत मी यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे कार्यकर्ता बंधूंना वाढदिवसासाठी पुस्तक, पेन वगैरे आणू नये, देऊ नये, अशी विनम्र विनंती करतो.
           वास्तविक पाहता कोणाच्याही वाढदिवसाला खर्च करण्याचे जनतेने टाळले पाहिजे. कारण त्यातून काहीही साध्य होत नाही. हार तुरे माणूस पुढे गेला की, बाहेर टाकून द्यावे लागतात. मग अशा भेट वस्तूंसाठी खर्च का करायचा ? याचा देखील जनतेने विचार करावा, असे आवाहन देखील मी या निमित्ताने करीत आहे. सर्व दृष्टीने आणि सर्व स्तरातील विचार मंथनानंतर हे लिहिले आहे. याबाबत कोणालाही राग लोभ नसावा.
           आपल्या शुभेच्छा आणि सदिच्छा पाठीशी आहेत त्या राहतील. या सदिच्छा आणि शुभेच्छांच्या जीवावरच मी आजपर्यंत समाजकार्य करत आलेलो आहे. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून हे कार्य माझ्या हातून शेवटपर्यंत चालू राहील. याचीही मी ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद.
Back to top button