बीड
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अद्वितीय कार्याने जगाला प्रभावित केले – मनपा उपआयुक्त रवींद्र जोगदंड यांचे प्रतिपादन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अद्वितीय कार्याने जगाला प्रभावित केले – मनपा उपआयुक्त रवींद्र जोगदंड यांचे प्रतिपादन
बीड (दि.१३) —डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान आणि विचार केवळ भारतापुरते मर्यादित न राहता आता जागतिक स्तरावर ओळखले जात आहेत. त्यांना एकेकाळी ‘भारतरत्न’ म्हणून गौरवले जात असे, तर आज त्यांचे तत्त्वज्ञान आणि कार्य ‘विश्वरत्न’ या उच्च दर्जाच्या पदवीने सन्मानित केले जात असल्याचे, प्रतिपादन छत्रपती संभाजी नगर येथील महानगरपालिकाचे उपआयुक्त्त मा.रवींद्र जोगदंड यांनी व्यक्त केले.
तुलसी शैक्षणिक समूह, बीड यांच्या वतीने शनिवार दि.१२ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीचे औचित्य साधून तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, यावेळी प्रमुख वक्ते म्हणून मा.रवींद्र जोगदंड बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवगिरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा.प्रदिप रोडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. प्राचार्य अनंद खरात, मा.वैजनाथ निर्मळ, प्रा.राम गायकवाड, प्रा.अर्जुन राठोड आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य प्रा.डी.जी निकाळजे यांनी, ‘महापुरुषांच्या विचारांतून युवा पिढीला विविध क्षेत्रांसाठी प्रेरणा मिळावी’ या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे,” असे नमूद केले.
रवींद्र जोगदंड यांनी, डॉ.आंबेडकरांच्या जीवनातील संघर्ष, समाजपरिवर्तन, शिक्षण आणि संविधान निर्मितीतील योगदानावर प्रकाश टाकला. बाबासाहेबांच्या संविधाननिर्मितीतील योगदानाने भारताच्या लोकशाहीला बळकटी आणली, तर त्यांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांनी जागतिक स्तरावर मानवाधिकार चळवळींना प्रेरणा दिली. आज जगभरातील विद्यापीठांमध्ये त्यांच्या विचारांचा अभ्यास केला जातो, तर अनेक आंतरराष्ट्रीय संस्था त्यांच्या तत्त्वज्ञानाचा आदर करतात.
असे सांगत ते पुढे म्हणाले की, एक काळ असा होता, जेव्हा बाबासाहेबांना आपण ‘भारतरत्न’ म्हणत होतो. मात्र, आजच्या घडीला बाबासाहेबांचे विचार, तत्त्वज्ञान आणि कार्य यांना ‘विश्वरत्न’ या उच्चपदस्थ पदवीने संबोधले जात आहे. एक काळ असा होता, जेव्हा बाबासाहेबांची जयंती ही फक्त फक्त भारतामध्येच साजरी केली जात होती. आता संपूर्ण जगभरात साजरी केली जात आहे, असे सांगत बाबासाहेबांच्या जीवनातील विविध पैलूंसंबंधी आपले विचार व्यक्त केले आणि जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषणात प्रा.प्रदीप रोडे म्हणाले की, ‘इतरांना ज्ञान देताना आपल्या स्वतःच्या ज्ञानात भर पडते. या ज्ञानवर्धनाच्या उद्देशाने आपण सर्व येथे एकत्रित आलो आहोत. महापुरुषांच्या कृतीचे आदर्श आपल्या दैनंदिन व्यवहारात कसे आणावेत याचा सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.योगिता लांडगे यांनी केले. यावेळी तुलसी समूहातील सर्व शाळा, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



