📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

मदारी वसाहतीच्या कामात दिरंगाई – वंचित बहुजन आघाडी आक्रमक

मदारी वसाहतीच्या कामात दिरंगाई – वंचित बहुजन आघाडी आक्रमक

शंभूराजे कन्स्ट्रक्शनची बेफिकिरी; मदारी समाज उघड्यावर

जामखेड | प्रतिनिधी:-यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत खर्डा (ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) येथे मदारी समाजासाठी मंजूर करण्यात आलेल्या वसाहतीच्या विकासकामात शंभूराजे कन्स्ट्रक्शनने दिरंगाई केल्याने पंचायत समिती, जामखेडने ठेकेदार संस्थेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दोन दिवसांत लेखी खुलासा न दिल्यास संस्थेचा समावेश काळ्या यादीत करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

मदारी समाजाच्या पुनर्वसनासाठी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी गेल्या १५ वर्षांपासून शासन दरबारी पाठपुरावा केला. अखेर २०२४ मध्ये शासनाने वसाहतीला मंजुरी देत ६४.१० कोटी रुपये निधी मंजूर केला. या कामाची निविदा १ मार्च २०२४ रोजी प्रसिद्ध झाली होती. शंभूराजे कन्स्ट्रक्शनने ३१ टक्के कमी दराने निविदा भरून काम मिळवले, मात्र शासनाच्या नियमांचे पालन न करता मनमानी कारभार सुरू ठेवला.

कामाच्या सुरुवातीपासूनच संस्थेने निधीचा आवश्यक भरणा केला नाही आणि काम वेळेत पूर्ण करण्यास अपयशी ठरली. परिणामी, मदारी समाजातील कुटुंबे अद्याप उघड्यावरच राहत आहेत. या दिरंगाईच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन केले होते.

आंदोलनाची दखल घेत गटविकास अधिकाऱ्यांनी शंभूराजे कन्स्ट्रक्शनला नोटीस बजावत दोन दिवसांत खुलासा देण्याचा आदेश दिला आहे. जर ठेकेदार संस्थेने समाधानकारक खुलासा दिला नाही, तर पुढील कडक कारवाई करत संस्थेचा समावेश काळ्या यादीत करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Back to top button