बीड
वडवणीत डिजेमुक्त ऐतिहासिक शिवजन्मोत्सव सोहळा साजरा होणार

वडवणीत डिजेमुक्त ऐतिहासिक शिवजन्मोत्सव सोहळा साजरा होणार
संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांची उपस्थिती राहणार
सर्व जाती धर्मातील शिवप्रेमींनी शिवजयंती मिरवणुकीस मोठ्या संख्येने उपस्थित रहा.
मिरवणुकीचे आकर्षण :- वारकरी पथक, हलकी पथक, मावळा पथक, छत्रपती शिवाजी महाराजांचा मेघडंबरी राजमहाल आकर्षक देखावा, ढोल पथक, कोल्हापूरचे शिवकला पथक,उंट,घोडे देखावा.
वडवणी ;-वडवणी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत शिवभक्त म्हणून संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मेघडंबरी राजमहाल आकर्षक देखावा सादर करण्यात येणार आहे. तसेच मिरवणुकीमध्ये
कोल्हापूर,अकलुज येथील नामांकित विविध पथक कला सादर करणार असून ऐतिहासिक डिजेमुक्त सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा साजरा होणार असल्याची माहिती सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने बुधवार दि. 26 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेत दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वडवणी येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा 2025 चे आयोजन करण्यात आले असून यामध्ये विविध सामाजिक, सांस्कृतीक, धार्मिक कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन करण्यात आलेले आहे, शुक्रवार दि.28 फेब्रुवारी 2025 रोजी भव्य मिरवणुक दुपारी 4 ते सायंकाळी 10 वाजेपर्यंत पार पडणार आहे. मिरवणूकीची सुरूवात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जिवाजी महाले चौक, संविधान चौक, स्व.वसंतराव नाईक चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,ते चाटे चौक येथे मिरवणुकीचे विसर्जन होणार आहे. या मिरवणुकीत कोल्हापूर येथील कलाकारांची प्रसिध्द नादमय ढोल ताशा ध्वजपथक, कोल्हापुर येथील युवक युवतींचे शिवकालीन युध्दकला खेळ पथक, धार्मिक कार्यक्रमांमध्ये पारंपारिक वारकरी वेशभूषामध्ये बाल वारकरी भजनी मंडळातील विविध खेळ, छत्रपती शिवाजी महाराजांचा मेघडंबरी राजमहाल आकर्षक देखावा, महाराष्ट्रातील अकलुज येथील प्रसिध्द हलगी पथक, उंट, घोडे देखावा सादर करण्यात येणार आहेत. भव्य दिव्य मिरवणुकीमध्ये सहभागी महिला व युवक पुरुषांना फेटेधारी महिला मंडळ व फेटेधारी युवक मंडळ, संपूर्ण शहरामध्ये निरनिराळ्या कलरमध्ये फटाक्यांची आतिषबाजी, वडवणी शहरात विद्युत रोषणाई, लेझर शो लाईट यांसह आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून डिजेमुक्त जयंती साजरी करण्यात येणार असून त्यामुळे यंदाचा हा शिवजन्मोत्सव सोहळा ऐतिहासीक ठरणार आहे. तरी या सर्व भरगच्च कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन वडवणी सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष संतोष डावकर यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. या पत्रकार परिषदेस नगराध्यक्ष शेषेराव जगताप, अमरसिंह मस्के, शिवाजी तौर, सचिव स्वप्निल मस्के, खजिनदार दत्तात्रय जमाले, उपाध्यक्ष बबलु शेळके, प्रसिद्धप्रमुख अविनाश मुजमुले, पांडुरंग कदम, सोमनाथ मस्के, सुरेश भोरे, प्रमेश्वर मस्के, हानुमंत शिंदे, सह आदी शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.



