बीड
कांशीरामजी यांच्या परिनिर्वाण दिनी ९ ऑक्टोबर रोजी नांदेड येथे ‘बहुजन सामाजिक परिवर्तन दिवस’

कांशीरामजी यांच्या परिनिर्वाण दिनी ९ ऑक्टोबर रोजी नांदेड येथे ‘बहुजन सामाजिक परिवर्तन दिवस’
नांदेड (प्रतिनिधी) : बहुजन समाज पक्षाचे संस्थापक, बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब यांच्या २० व्या स्मृतिदिनानिमित्त नांदेड येथे ‘बहुजन सामाजिक परिवर्तन दिवस’ समारोह व अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. कांशीरामजी यांच्या परिनिर्वाणदिनी शुक्रवार, ९ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता, बहुजन समाज पक्षाच्या मराठवाडा झोन कार्यालय, वाय कॉर्नर, गणेशनगर रोड, नांदेड येथे हा कार्यक्रम होणार आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीला पुढे नेण्यासाठी तसेच फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारित बहुजन समाजाची राजकीय व सामाजिक शक्ती उभी करण्यासाठी मान्यवर कांशीराम साहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला. बहुजन समाजाला संघटित करून राजकीय सत्तेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याचा त्यांनी मार्ग दाखविला. त्यांच्या कार्याचे स्मरण आणि त्यांच्या विचारांचा जागर करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मान्यवर कांशीराम साहेबांनी बामसेफ, बीआरसी, डी.एस.-४ आणि बहुजन समाज पक्षाच्या माध्यमातून देशभरातील बहुजन समाजाला संघटित करण्याचे ऐतिहासिक कार्य केले. त्यांच्या अथक परिश्रमातून बहुजन समाज पक्षाला राष्ट्रीय राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली. ‘बहुजन समाजाची सत्ता हिच सामाजिक परिवर्तनाची गुरुकिल्ली’ हा विचार त्यांनी जनमानसात रुजविला.
नांदेड येथील या कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष ॲड . सुनील डोंगरे, प्रदेश महासचिव मुकुंददादा सोनवणे, प्रदेश कोषाध्यक्ष अशोक राठोड, प्रदेश सचिव तथा मराठवाडा झोन प्रभारी मनीषभाऊ कावळे, प्रदेश सचिव इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, प्रदेश सचिव विलास शेरखाने, प्रदेश सचिव रमेश भिसे पाटील यांच्यासह बहुजन समाज पक्षाचे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नांदेड जिल्हाध्यक्ष सुभाष भोकरे, तसेच जिल्हा व विधानसभा स्तरावरील पदाधिकारी, कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. नांदेड जिल्हा प्रभारी शिवाजी सोनटक्के, जयवंत शोरात, सटवा सोनकांबळे, लक्ष्मण वायवळे, लोकेश कांबळे, ॲड. एस. एल. कापसे, धम्मपाल गच्चे यांच्यासह जिल्हा महासचिव सुधाकर सरोदे, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल कोठेवाड, जिल्हा कोषाध्यक्ष सखाराम मामा इंगोले, जिल्हा सचिव भीमराव भाटापूरकर, मिलिंद धावारे, बीव्हीएफ प्रमुख भीमराव सातोरे, महिला जिल्हाध्यक्षा मायाताई पाटील, महासचिव जयश्री राऊत यांच्यासह जिल्ह्यातील विविध पदाधिकारी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेत आहेत.
‘कांशीरामजी साहेबांच्या विचारांचा जागर आणि सामाजिक परिवर्तनाचा संकल्प’ या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास नांदेड जिल्ह्यातील व मराठवाड्यातील बहुजन समाज बांधव, पदाधिकारी, कार्यकर्ते व परिवर्तनवादी विचारांच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन साहेबराव नरवाडे, प्रा. विजयकुमार भरणे, साईनाथ निळकंठे, भीमराव पाटील, धम्मपाल मुनेश्वर, ॲड. जे. पी. सोमवंशी, संजय गुंडेकर, अविनाश इटकापल्ले, धोंडिबा झिंकवाड, जय पंडित, नागसेन खंदारे, आनंदा खंदारे, नागोराव ढवळे, अशोक टोके, रमेश लोणे, सतिष पाटील, नारायण घुले आदी आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


