बीड
मिंडसांगवीत माउलींच्या जयघोषात संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे पहिले ‘गोल रिंगण’ उत्साहात संपन्न

मिंडसांगवीत माउलींच्या जयघोषात संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे पहिले ‘गोल रिंगण’ उत्साहात संपन्न
अश्वांच्या नेत्रदीपक दौडीने रंगला सोहळा; हजारो वारकरी आणि भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती
पैठण | किरण काळे
शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याने पंढरपूरच्या दिशेने वाटचाल सुरू असताना, पाथर्डी तालुक्यातील मिंडसांगवी येथे परंपरेनुसार पार पडलेले पहिले ‘गोल रिंगण’ भक्तिभाव, शिस्त आणि वारकरी परंपरेच्या वैभवाचे अविस्मरणीय दर्शन घडवणारे ठरले. माउलींच्या अखंड जयघोषाने दुमदुमलेल्या वातावरणात हजारो वारकरी, भाविक आणि ग्रामस्थांनी या नयनरम्य सोहळ्याचा डोळे भरून आनंद घेतला.
मुंगी वाडे मुक्कामाच्या मार्गावर दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास रिंगण सोहळ्यास प्रारंभ झाला. मैदानाच्या मध्यभागी संत एकनाथ महाराजांची पालखी विराजमान होती. पालखीभोवती हजारो टाळकरी हातात टाळ आणि चिपळ्या घेऊन गोलाकार उभे राहिले. “भानूदास एकनाथ”, “ज्ञानोबा-तुकाराम” आणि “विठ्ठल… विठ्ठल…” या अखंड नामगजराने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. टाळांच्या लयीवर वारकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे ‘पावली’ खेळत भक्तीचा अनोखा आविष्कार सादर केला. त्यांच्या मागे भगवे झेंडे हातात घेतलेले वारकरी शिस्तबद्ध रचनेत बसले होते.
पावलीचा खेळ रंगात आल्यानंतर टाळकऱ्यांनी संत एकनाथ महाराजांच्या पालखीभोवती मनोभावे प्रदक्षिणा घातली. त्यानंतर विविध दिंड्यांचे झेंडेकरी, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या माऊली, पाण्याचे कलश मस्तकी धारण केलेल्या महिला भाविक तसेच विणेकऱ्यांनीही अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पालखीभोवती प्रदक्षिणा घालत दर्शनाचा लाभ घेतला. वारकरी संप्रदायातील शिस्त, समर्पण आणि भक्तीभावाचे हे दृश्य उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरले.
रिंगण सोहळ्याचा सर्वाधिक उत्कंठावर्धक आणि आकर्षणाचा क्षण म्हणजे मानाच्या दोन अश्वांची दौड. देवाचा अश्व आणि जरीपटकाधारी स्वाराचा अश्व रिंगणात दाखल होताच उपस्थित भाविकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला. दोन्ही अश्वांनी पालखीभोवती सलग तीन प्रदक्षिणा पूर्ण केल्या. अंतिम फेरीत परंपरेप्रमाणे देवाचा अश्व जरीपटकाधारी अश्वाला मागे टाकत पुढे निघाला आणि त्याच क्षणी हजारो वारकऱ्यांनी एकमुखाने जयघोष करत संपूर्ण परिसर भक्तिमय केला. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठलनामाच्या अखंड घोषात पहिले गोल रिंगण यशस्वीरित्या संपन्न झाले.
यावेळी शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळा प्रमुख तथा नाथ वंशज ह.भ.प. रघुनाथ महाराज पालखीवाले आणि योगेश महाराज पालखीवाले यांनी सांगितले की, “मिंडसांगवी येथील हे गोल रिंगण नाथांच्या पालखी सोहळ्यातील पहिले आणि अत्यंत मानाचे रिंगण मानले जाते. अश्वांच्या तीन प्रदक्षिणांनंतर देवाचा अश्व जरीपटकाधारी अश्वाला मागे टाकून पुढे जातो, तेव्हाच रिंगण सोहळा पूर्ण झाल्याचे मानले जाते. ही परंपरा वारकरी संप्रदायातील श्रद्धा, शिस्त आणि भक्तीचे प्रतीक आहे.”
मिंडसांगवीतील या पहिल्या गोल रिंगणाने संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यातील भक्ती, परंपरा आणि वारकरी संस्कृतीचा अद्वितीय संगम पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला. विठ्ठलनामाच्या अखंड गजरात पुढील प्रवासासाठी पालखी मार्गस्थ होताच “ज्ञानोबा-तुकाराम” आणि “भानूदास एकनाथ”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर पुन्हा एकदा भक्तिमय झाला.



