बीड
कुंभारवाडी येथे नदी खोलीकरण व सरळीकरण कामाचा शुभारंभ

कुंभारवाडी येथे नदी खोलीकरण व सरळीकरण कामाचा शुभारंभ
‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजनेला वेग; जलसंवर्धनासाठी शारदा प्रतिष्ठानचा पुढाकार
गेवराई (प्रतिनिधी) : गेवराई विधानसभा मतदारसंघाला दुष्काळमुक्त करण्याच्या उद्देशाने शारदा प्रतिष्ठानच्या वतीने जलसंवर्धनाची विविध कामे सातत्याने राबवली जात असून, महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत तालुक्यातील अनेक प्रकल्पांना गती मिळत आहे. याच उपक्रमांतर्गत मौजे कुंभारवाडी येथे दि. १७ मे रोजी नदी खोलीकरण आणि सरळीकरण कामाचा उत्साहपूर्ण शुभारंभ करण्यात आला.
महाराष्ट्र शासन, नाम फाऊंडेशन आणि शारदा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत असून, भविष्यात गेवराई तालुक्यातील जलसंकट दूर करण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले.
नदी खोलीकरण आणि सरळीकरणामुळे पावसाचे पाणी अधिक प्रमाणात साठवले जाणार असून, भूजल पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. तसेच विहिरी, बोअरवेल आणि शेततळ्यांमध्ये पाणीसाठा वाढून शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. दुष्काळाच्या झळा कमी करून शेतीला शाश्वत पाणीपुरवठा करण्यासाठी हा उपक्रम प्रभावी ठरेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
“पाण्याचा प्रत्येक थेंब अडवूया आणि गेवराई तालुका सुजलाम-सुफलाम करूया,” असा संदेश यावेळी देण्यात आला. जलसंवर्धनाच्या या मोहिमेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, भविष्यात अशाच विकासकामांना अधिक गती देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.



