बीड

अवैध वाळू उपशामुळे तरुणाचा मृत्यू? सावळेश्वर येथील घटनेने खळबळ

अवैध वाळू उपशामुळे तरुणाचा मृत्यू? सावळेश्वर येथील घटनेने खळबळ

गेवराई | प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील सावळेश्वर येथे अवैध वाळू उपशाच्या कामादरम्यान एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हायवा वाहनात वाळू भरत असताना लोडरच्या खोऱ्यातील दगड तरुणाच्या डोक्यात पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असल्याचे स्थानिकातून बोलले जात असून मृत तरुणाचे नाव सचिन पुरी असे असून ही घटना सोमवार दि. ११ मे रोजी रात्री घडल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सावळेश्वर परिसरात रात्रीच्या वेळी अवैध वाळू उपसा सुरू होता. यावेळी हायवा वाहनात वाळू भरताना लोडरमधून मोठा दगड खाली पडून तो सचिन पुरी यांच्या डोक्यात लागला. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेनंतर महसूल व पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. घटनेच्या आदल्या दिवशी त्याच ठिकाणी महसूल पथकाने कारवाईदरम्यान पकडलेले हायवा वाहन पैसे घेऊन सोडल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. संबंधित प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचेही बोलले जात आहे. मात्र, व्हिडिओ समोर येऊनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत.“जर त्या वेळी कठोर कारवाई झाली असती आणि हायवा वाहन सोडले नसते, तर आज सचिन पुरी जिवंत असता,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे सावळेश्वर परिसरात अवैध वाळू उपसा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला असून, संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून महसूल व पोलीस प्रशासनातील संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

चौकट

अवैध वाळू प्रकरणी पोलीस व महसूल खाते फक्त पैसे खायलाच का?

गेवराई तालुक्यातील सावळेश्वर येथे अवैध वाळू उपशादरम्यान सचिन पुरी या तरुणाचा झालेला मृत्यू संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट निर्माण करणारा ठरला आहे. हायवा वाहनात वाळू भरताना लोडरच्या खोऱ्यातील दगड डोक्यात पडल्याने सचिन पुरी यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आता नागरिकांकडून पोलीस व महसूल प्रशासनावर गंभीर आरोप करण्यात येत आहेत.
“अवैध वाळू उपसा सुरू असताना प्रशासन नेमके काय करत होते?”, “पोलीस व महसूल खाते फक्त पैसे खाण्यासाठीच आहे का?” असे संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

जिल्हाधिकारी साहेब, व्हिडिओ व्हायरल झाला… कारवाई करणार कोण?

चौकट

गेवराई तालुक्यातील सावळेश्वर येथे अवैध वाळू उपशादरम्यान सचिन पुरी या तरुणाचा झालेला मृत्यू संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. या घटनेनंतर आता महसूल व पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, “जिल्हाधिकारी साहेब, व्हिडिओ व्हायरल झाला… कारवाई करणार कोण?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

चौकट

सचिन पुरी या तरुणाच्या मृत्यूस
जबाबदार कोण ?
▪ अवैध वाळू उपसा सुरूच कसा?
▪ महसूल व पोलीस प्रशासन झोपेत?
▪ व्हायरल व्हिडिओनंतरही कारवाई नाही
▪ हायवा सोडण्यामागे कोणाचे आशीर्वाद?
▪ एका निष्पाप तरुणाचा जीव गेला
▪ दोषींवर कठोर कारवाईची मागणी

Back to top button