बीड

बीडच्या आदित्य फार्मसी कॉलेजचा ‘नॅशनल’ डंका; ७ विद्यार्थी GPAT परीक्षेत यशस्वी

बीडच्या आदित्य फार्मसी कॉलेजचा ‘नॅशनल’ डंका; ७ विद्यार्थी GPAT परीक्षेत यशस्वी
— जिद्द आणि मेहनतीला कष्टाची जोड; नॅशनल रँकिंग, उच्च शिक्षणाचे मार्ग मोकळे
बीड | प्रतिनिधी
नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (NTA) घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील GPAT 2026 (ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्ट) परीक्षेत बीडच्या आदित्य फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या निकालाने जिल्ह्याच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून, संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. या कठीण परीक्षेत आदित्य फार्मसी कॉलेजच्या तब्बल सात विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.यामध्ये येलदेपवाड व्यंकटरामन प्रकाश, संतोष दत्ताराव गवळी, संग्रामसिंह दशरथ भाटेकर, ज्ञानेश्वर विश्वम्भर विघ्ने, खुशी वीरेंद्र यादव, ओंकार उद्धवराव डाके, ओंकार मछिंद्र जगताप या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या यशाबद्दल आदित्य शिक्षण संस्थेचे मुख्य प्रवर्तक सुभाषचंद्र सारडा, संचालिका डॉ. आदिती सारडा आणि संचालक डॉ. आदित्य सारडा यांनी यशस्वी विद्यार्थांचे अभिनंदन केले. GPAT ही परीक्षा फार्मसी क्षेत्रातील उच्च शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते.या परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना देशातील ‘नायपर’ (NIPER) सारख्या नामांकित संस्थांमध्ये प्रवेशाची संधी मिळते. तसेच पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचा मार्गही मोकळा होतो.विद्यार्थ्यांची जिद्द आणि महाविद्यालयाने पुरवलेल्या आधुनिक शैक्षणिक सुविधांमुळेच हे यश शक्य झाले आहे. हे यश विद्यार्थ्यांच्या जिद्दीचे आणि शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाचे फलित आहे. आमचे महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच तत्पर असते. विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाचे आज खऱ्या अर्थाने चीज झाले असे आदित्य फार्मसी कॉलेज चे प्रचार्य डॉ. दीपक पवार यावेळी म्हणाले. तर आदित्य फार्मसी कॉलेज प्राचार्य डॉ. कुमार सुरवसे म्हणले की, GPAT सारखी स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्ण होणे म्हणजे विद्यार्थ्यांची गुणवत्ता राष्ट्रीय स्तरावर सिद्ध होणे होय. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असून शैक्षणिक दर्जा सुधारण्यास मदत झाली आहे.

विद्यार्थ्यांच्या यशामुळे महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा अधिक उंचावला आहे. त्यांनी भविष्यातही अशीच उत्तुंग कामगिरी करत राहावी. या यशाने संस्थेतील इतर विद्यार्थांनाही प्रेरणा मिळत आहे.
-डॉ. आदित्य सारडा, संचालक आदित्य शिक्षण संस्था, बीड.
Back to top button