📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

भोंदू अशोक खरात प्रकरणावरून अंधश्रद्धेविरोधात कठोर कारवाईची मागणी; ‘मअंनिस’ बीडचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

भोंदू अशोक खरात प्रकरणावरून अंधश्रद्धेविरोधात कठोर कारवाईची मागणी; ‘मअंनिस’ बीडचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
बीड (दि. २४) – नाशिक येथे उघडकीस आलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सुरू असलेल्या अंधश्रद्धा, बुवाबाजी, सत्ता व संपत्तीच्या संगनमतातून होत असलेल्या महिलांच्या शोषणाविरोधात कठोर आणि व्यापक कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (मअंनिस) बीड शाखेने केली आहे. याबाबतचे सविस्तर निवेदन मा. मुख्यमंत्री महोदयांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सादर करण्यात आले.
या निवेदनाचे नेतृत्व विवेक वाहिनीच्या राज्य कार्याध्यक्ष प्राचार्य सविता शेटे यांनी केले असून, केवळ अशोक खरात या एका आरोपीपुरते प्रकरण मर्यादित न ठेवता, त्यामागील संपूर्ण रॅकेट व संगनमत उघड करण्याची मागणी करण्यात आली आहे. अंधश्रद्धा, भीती, असुरक्षितता व अज्ञानाचा फायदा घेत ‘दैवी शक्ती’, ‘अध्यात्म’ आणि ‘फलज्योतिष’च्या नावाखाली महिलांचे व सर्वसामान्यांचे होत असलेले शोषण अत्यंत चिंताजनक असल्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.
मअंनिसने या प्रकरणाची निष्पक्ष, निर्भय व पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, “महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अधिनियम, २०१३” या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासोबतच, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली नियमावली तातडीने पूर्ण करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
राज्यघटनेने अधोरेखित केलेल्या ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ मूल्यांची जपणूक करण्यासाठी शाळा, महाविद्यालये व समाजात व्यापक जनजागृती मोहीम राबवावी. तसेच, राजकीय पक्ष व नेत्यांनी भोंदू बाबा, बुवा, मांत्रिक व ज्योतिषी यांच्याशी असलेले संबंध तत्काळ तोडून विवेकी आचारसंहिता तयार करावी, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली आहे.
अशोक खरातसारखी प्रकरणे राज्यभर असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सर्व जिल्हा पोलीस प्रशासनाला विशेष तपासाचे स्पष्ट निर्देश देऊन गुन्हे नोंदविण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
या निवेदनावर मअंनिसचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, विवेक वाहिनीच्या प्राचार्य सविता शेटे, जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य कॉ. डी. जी. तांदळे, बीड शाखा कार्याध्यक्ष प्रा. विजय घेवारे, विधिज्ञ कॉ. करुणा टाकसाळ, रामधन जमाले (इंटक) प्रतिक राऊत, आदित्य वीर, नितीन रांजवण, अनिता जोगदंड, मीरा डोईफोडे, बाजीराव ढाकणे, शुभांगी कुलकर्णी, कौशल्या बावने, राणी कातखेडे, डॉ. संजय तांदळे, प्रवीण सोनवणे, शेख अमर पाशा, किरण घाडगे, रुक्मिणी नागापुरे, तेजस्विनी भाटे, रणजित माने आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Back to top button