महाराष्ट्र

नगराध्यक्ष अविनाश गायगोले ॲक्शन मोडवर; अंजनगाव सुर्जी शहर स्वच्छ-सुंदर करण्याची मोहीम सुरू

पंकज हिरुळकर जिल्हा प्रतिनिधी 

अंजनगाव सुर्जी : शहरातील वाढत्या अस्वच्छतेच्या समस्येला आळा घालण्यासाठी नवनिर्वाचित नगराध्यक्ष अविनाश गायगोले यांनी ॲक्शन मोड घेत संपूर्ण शहर स्वच्छ व सुशोभित करण्याची व्यापक मोहीम हाती घेतली आहे. त्यांच्या आदेशानंतर सफाई कामगार तत्काळ सक्रिय झाले असून, अनेक महिन्यांपासून रखडलेली स्वच्छता कामे आता गतीने सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून अंजनगाव सुर्जी शहरात स्वच्छतेचा अभाव जाणवत होता. रस्त्यांवर साचलेला कचरा, गटारे, अस्वच्छ प्ले-ग्राउंड, तुडुंब भरलेल्या नाल्या, वाढता मच्छरांचा प्रादुर्भाव आणि ठिकठिकाणी तयार झालेले घानिचे व कचर्‍याचे ढिग यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आणि संताप व्यक्त होत होता. “शहराचा वाली कोणी राहिला नाही” अशी भावना अनेकांच्या मनात निर्माण झाली होती.

मात्र, नगराध्यक्ष अविनाश गायगोले यांनी पदभार स्वीकारताच परिस्थिती बदलण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी शहरातील स्वच्छतेच्या कामांचा आढावा घेत तातडीने संबंधित विभागाला आदेश दिले. यानंतर सफाई कर्मचाऱ्यांनी विविध भागात स्वच्छता मोहीम राबवून कचरा उचलणे, नाल्यांची साफसफाई करणे आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे.

नगराध्यक्षांच्या या निर्णयामुळे नागरिकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. “आता तरी शहर स्वच्छ होईल का?” आणि “नियमित साफसफाई व डास निर्मुलन फवारणी कायम राहील का?” असे प्रश्न नागरिक विचारत असले तरी सुरू झालेल्या कामांमुळे सकारात्मक अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. विशेषतः मच्छरांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढला होता. त्यामुळे ही स्वच्छता मोहीम आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

नगराध्यक्षांनी केवळ एकदाच मोहीम राबवून थांबणार नसून, नियमित स्वच्छतेसाठी ठोस नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात नियमित कचरा संकलन, नाल्यांची वेळोवेळी साफसफाई, डास निर्मुलन फवारण्या आणि स्वच्छतेबाबत जनजागृती यावर भर दिला जाणार आहे. यासाठी नागरिकांचे सहकार्यही तितकेच महत्त्वाचे असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, अंजनगाव सुर्जी शहराचा चेहरामोहरा बदलण्याच्या दृष्टीने संपुर्ण शहरात सुशोभीकरणाच्या कामांनाही लवकरच सुरुवात होणार असल्याचे संकेत आहेत. स्वच्छ रस्ते, स्वच्छ सुंदर प्लेग्राउंड, स्वच्छ नाले-नाल्या, सुंदर सार्वजनिक स्थळे आणि नियोजनबद्ध कचरा व्यवस्थापन यामुळे शहराची ओळख बदलण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

नवनिर्वाचित नगराध्यक्षांवर अंजनगाव सुर्जीकरांनी मोठ्या अपेक्षा ठेवलेल्या आहेत. शहर केवळ स्वच्छच नव्हे तर सुंदर आणि आदर्श बनावे, तसेच इतर शहरांतील नागरिकांनाही पाहून हेवा वाटेल असे अंजनगाव सुर्जी घडवावे, अशी सर्वसामान्यांची इच्छा आहे. आता नगराध्यक्षांच्या या उपक्रमामुळे या अपेक्षा कितपत पूर्ण होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button