बीड

मतदार यादीतील त्रुटींमुळे मॅपिंगमध्ये अडथळे; फॉर्म ८ ऑनलाईन सेवा तातडीने सुरू करा

मतदार यादीतील त्रुटींमुळे मॅपिंगमध्ये अडथळे; फॉर्म ८ ऑनलाईन सेवा तातडीने सुरू करा
सामाजिक कार्यकर्ते शेख आसिफुद्दीन यांची मागणी
बीड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार यादी मॅपिंग प्रक्रियेदरम्यान अनेक जुन्या मतदारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही मतदारांची नावे सन २००२ पासून मतदार याद्यांमध्ये असतानाही नाव, आडनाव तसेच जन्मतारीख यामधील त्रुटींमुळे त्यांचे मॅपिंग होत नसल्याची तक्रार समोर येत आहे.
बीड शहरातील लक्ष्मण नगर, शहिंशाह नगर येथील रहिवासी शेख आसिफुद्दीन गौस मोहिउद्दीन यांनी याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. त्यांनी सांगितले की, अनेक मतदारांची नावे अनेक वर्षांपासून मतदार याद्यांमध्ये असूनही नाव, आडनाव किंवा जन्मतारीख चुकीची नोंद झाल्यामुळे सध्याच्या मॅपिंग प्रक्रियेदरम्यान माहिती जुळत नाही. त्यामुळे संबंधित मतदारांचे मॅपिंग होत नसून नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
याशिवाय मतदार यादीतील दुरुस्ती करण्यासाठी वापरला जाणारा फॉर्म क्रमांक ८ सध्या ऑनलाईन बंद आहे, त्यामुळे नागरिकांना नाव, आडनाव किंवा जन्मतारीख दुरुस्ती करता येत नाही. यामुळे मॅपिंग प्रक्रियेत अधिक अडथळे निर्माण होत आहेत.
मॅपिंगची अंतिम तारीख १ एप्रिल जवळ येत असल्याने या त्रुटी तातडीने दुरुस्त होणे आवश्यक आहे.
याबाबत शेख आसिफुद्दीन गौस मोहिउद्दीन यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी, बीड यांच्याकडे मागणी केली आहे की फॉर्म क्रमांक ८ ची ऑनलाईन सेवा तातडीने सुरू करण्यात यावी तसेच नाव, आडनाव व जन्मतारीख दुरुस्तीसाठी १ एप्रिलपूर्वी विशेष वेळ देण्यात यावा किंवा पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, जेणेकरून मॅपिंग प्रक्रियेत कोणत्याही मतदाराला अडचण येऊ नये.
Back to top button