📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

परळी वैजनाथ येथील नवगण महाविद्यालयात राष्ट्रीय परिषदेचा समारोप

परळी वैजनाथ येथील नवगण महाविद्यालयात राष्ट्रीय परिषदेचा समारोप

परळी वैजनाथ येथील नवगण महाविद्यालयामध्ये आयोजित राष्ट्रीय परिषदेचा समारोप उत्साहात आणि शैक्षणिक वातावरणात पार पडला. परिषदेमध्ये शिक्षण क्षेत्रातील बदलते प्रवाह, बहुभाषिकता, अंतर्विद्याशाखीय दृष्टिकोन तसेच डिजिटल अध्यापनातील नव्या संधी आणि आव्हानांवर सखोल चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आबासाहेब हांगे होते. प्रमुख वक्ते म्हणून श्री बाळासाहेब देशमुख यांनी समारोपपर भाषण करताना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापरावर भाष्य केले. “कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर शिक्षणात करताना मानवी संवेदना, मूल्ये आणि नैतिकता जपणे अत्यावश्यक आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. डिजिटल साधनांमुळे शिक्षण अधिक सुलभ झाले असले तरी शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील मानवी संवाद कमी होऊ नये, यासाठी सर्वांनी सजग राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

या प्रसंगी डॉ मुंजा धोंडगे (सिनेट सदस्य) डॉ. मधुकर आघाव, डॉ. रजनी सटाने, डॉ. गुणलाल विटोरे, डॉ. फारुकी मेहाजबिल, डॉ. हरिभाऊ कदम, डॉ. उषा माने, डॉ. रमेश राठोड, डॉ. दिलीप चव्हाण, डॉ. अशोक चव्हाण आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी परिषदेमधील विषयांवर आपले विचार मांडत शिक्षण क्षेत्रातील नव्या संधी आणि आव्हानांवर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजा आचार्य यांनी केले. आपल्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. हांगे यांनी डिजिटल अध्यापन व संशोधन क्षेत्रातील बदलत्या प्रवाहांचा आढावा घेतला. उपप्राचार्य डॉ. लालासाहेब भुमरे यांनी आभार प्रदर्शन करताना सर्व मान्यवर, सहभागी प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

या राष्ट्रीय परिषदेमुळे शिक्षण क्षेत्रात बहुभाषिक व अंतर्विद्याशाखीय दृष्टिकोनासोबतच कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदारीने वापर करण्याची जाणीव अधिक दृढ झाली. राज्यभरातून सुमारे सव्वादोनशे संशोधकांनी परिषदेसाठी शोधनिबंध पाठवून प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. निवडक शोधनिबंधांचे विद्यावार्ता आंतरराष्ट्रीय बहुभाषिक संशोधन पत्रिकाच्या ऑनलाइन विशेषांकामध्ये प्रकाशन करण्यात आले.

Back to top button