रस्ता की खड्ड्यांचा सापळा?१५ दिवसांचा अल्टिमेटम; अन्यथा आमरण उपोषण

रस्ता की खड्ड्यांचा सापळा?१५ दिवसांचा अल्टिमेटम; अन्यथा आमरण उपोषण
सामाजिक कार्यकर्ते अनिल सदाफुले यांचा प्रशासनाला इशारा
जामखेड प्रतिनिधी :
जामखेड शहरातून जाणाऱ्या खर्डा रोडवरील खर्डा चौक ते अहिल्याबाई होळकर (चौफुला) चौकापर्यंतच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सदर खड्डे अनेक वेळा बुजवण्यात आले असले तरी रस्ता सुरळीत झालेला नसल्याचे चित्र आहे. खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून हा रस्ता पूर्णपणे नव्याने करण्याची गरज असल्याची मागणी होत आहे.
खड्डे बुजवताना मुरुमाचा वापर केला जात असल्याने परिसरात धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या धुळीमुळे शेजारील रहिवाशांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. तसेच रस्त्यावरील खोल खड्ड्यांमुळे वाहने जाताना घरांना हादरे बसत असून अनेक घरांच्या भिंतींना तडे गेल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.
याशिवाय या रोडवरील एवन कॉर्नरजवळ गतीरोधक बसवावेत, जेणेकरून वळणावरून वाहने सावकाश जातील व अपघात टळतील, अशी मागणी करण्यात आली आहे. खड्डे बुजवण्याऐवजी खर्डा चौक ते अहिल्याबाई होळकर (चौफुला) चौकापर्यंत संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्त्यावरील डिव्हायडर काढण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल विठ्ठल सदाफुले यांनी केली आहे.
सदर कामे १५ दिवसांत पूर्ण न झाल्यास दिनांक १२ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय, जामखेड समोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, या विषयाबाबत तहसील कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच उपअभियंता यांच्या कार्यालयात निवेदनाची प्रत देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.



